कर्जत तालुक्यातील देशमुखवाडी येथील बुवासाहेब दूध संकलन केंद्राकडून आपल्या दूध उत्पादकांना या दिवाळीत ३० पैसे प्रति लिटर बोनस दिला जाणार आहे. संकलन केंद्राचे चेअरमन कैलास अर्जुन बरबडे यांच्या नेतृत्वाखालील या दूध संकलन केंद्राने त्यांच्याकडील दूध उत्पादकांना दिवाळीच्या निमित्ताने शुक्रवारी ( दि. २) बोनसचे वाटप केले जाणार आहे. या केंद्राने आपले कार्यक्षेत्र विस्तारून दूध संकलनात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. दूध उत्पादकांच्या सोयीसाठी केंद्रातून गोळी, पेंड, भुसा याचेही माफक दरात वितरण केले जाते. त्यामुळे शेतकरी आणि दूध उत्पादकांसोबत दूध संकलन केंद्राचा विश्वास निर्माण झालेला आहे, असे बरबडे म्हणाले.
याबाबत बोलताना बरबडे पुढे म्हणाले, या बोनसच्या माध्यमातून केंद्राचे शेतकरी आणि दूध उत्पादक यांच्याशी असलेले नाते अधिक मजबूत होणार आहे. मोठ्या परिश्रमातून दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना या बोनसमुळे दिवाळीत मोठा दिलासा मिळणार आहे. आर्थिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना हा बोनस खूपच उपयुक्त ठरेल. बुवासाहेब दूध संकलन केंद्राने सुरूवातीपासूनच दूध उत्पादकांसाठी विविध सवलती आणि सुविधा पुरवल्या आहेत. यावर्षीच्या बोनसने दूध उत्पादकांना आर्थिक सहाय्य मिळून त्यांच्या कुटुंबासह दिवाळी सणाचा आनंद द्विगुणीत होणार आहे.