सर्वसामान्य जनतेची पहिली गरज आहे, ‘भाकरी’ . भाकरीच्या प्राप्तीसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे सोडून त्यांच्या हातात धर्माचे जातीचे अस्मितेचे गाजर देऊन चघळीत बसायला लावणाऱ्या सर्व संधी साधू राजकारण्यांना जनतेनेच धडा शिकवायला हवा. एकमेकांच्या सत्तेची ताकद दाखवण्यासाठी सामान्य जनतेच्या गळ्यावरून आपल्या खोट्या कर्तुत्वाचे शस्त्र फिरवून स्वतःचे मोठेपण सिद्ध करण्यात मग्न असणारे आणि एकमेकांचे उणे दुणे काढित सामान्यांना झुलवीत ठेवणाऱ्या तथाकथित नेत्यांना घरचा रस्ता दाखवीत आपली ताकद दाखवण्याचा एकमेव मार्ग आहे निवडणूक.
दररोजच्या ३५ पैशासाठी स्वतःला विकणाऱ्या मतदारांनी आपल्या आयुष्य कोणाच्या हाती देत आहोत याचा विचार करायला हवा. कुणा अण्णा, दादा, बाबा किंवा आप्पा यांसाठी स्वतःच्या अंगावर केसेस घेऊन स्वतःच्याच कुटुंबाची ससेहोलपट करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा जागृत होण्याची वेळ आली आहे.
‘आधी प्रपंच करावा नेटका, असू नये तो फाटका” या ऊक्तीप्रमाणे स्वतःचा प्रपंच, मुलेबाळे, त्यांचे शिक्षण, त्यांच्यावर होणारे संस्कार याकडे लक्ष देऊन वेळ शिल्लक राहिला तरच पारावर राजकारणाच्या गप्पा मारण्यासाठी आपल्यासारख्या सामान्य जणांनी जमायला हवे.
सत्तेसाठी कुणाच्याही बरोबर युती किंवा आघाडी करणाऱ्या स्वार्थी राजकारण्यांच्या किती मागे फिरायचे व स्वतःचे नुकसान करून घ्यायचे हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे. देशाला नक्कीच चांगली लोकशाही मिळायला हवीच पण त्याचबरोबर आपला दैनंदिन कामाचा वेळ सत्कारणी लावून उरलेल्या वेळात समाजकारण करा, नक्कीच तुमच्या माध्यमातून कुटुंबाची, समाजाची राज्याची आणि देशाची सर्वांगीण प्रगती होईल.
देश आपल्यासाठी काय करतो यापेक्षा आपण देशासाठी काय करतो याचाही विचार व्हायला हवा
उठा, जागे व्हा, आपले कुटुंब, आपले निर्धारित काम आपली वाट पाहत आहे.
आपण मतदार आहोत, राज्य किंवा राष्ट्र निर्माता आहोत म्हणून निर्भयपणे, निस्वार्थी वृत्तीने, सदविवेक बुद्धी जागृत ठेवून इतर कामे बाजूला ठेवून मतदानाचा हक्क बजावा, धर्म, जात, पंथ, पक्ष यापलीकडे जाऊन सर्वसामान्य जणांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी निस्वार्थीपणे कार्य करणाऱ्या व्यक्तीला आपला सेवक बनवा.
शेवटी निर्णय तुमचा, कारण आयुष्य घडवायचं की बिघडवायचं तुम्हीच ठरवा !
सुनील गोरखे,
नागरीक, कर्जत