देशामध्ये दहा कोटी घुसखोर असून बांडगुळांप्रमाणे हा आपला देश खातात, यांना बाहेर काढण्याची गरज आहे, अशी टीका सुनील चव्हाणके यांनी कर्जत येथे केली आहे. घुसखोरीच्या विरोधात जनजागरण करण्यासाठी सुनील चव्हाणके यांनी शिव प्रेरणा यात्रा पश्चिम महाराष्ट्रामध्ये काढली आहे. या यात्रेचे कर्जत येथे जोरदार स्वागत करण्यात आले. शहरामध्ये दुचाकीवरून भगवे झेंडे लावून भव्य रॅली काढण्यात आली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना चव्हाणके म्हणाले, आज देशासमोर जे अनेक प्रश्न आहेत त्यातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो घुसखोरीचा. देशामध्ये दहा कोटी घुसखोर सध्या राहत आहेत. महाराष्ट्रामध्ये त्यांची संख्या १ कोटी असून यामध्ये मुंबई, पुणे यासह अनेक शहरांमध्ये हे अफगानपुरा या नावाने राहत आहेत. या सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशी, अफगाणी, पाकिस्तानी आणि रोहिंगे यांचा समावेश आहे. सर्वांना सामावून घेण्याची आपली संस्कृती असली तरी देखील आज ती आपल्यासाठी अडचणीची झाली आहे.
या घुसखोरीवर राज्य व केंद्र सरकारने कार्यवाही करावी आणि त्यांना या देशातून बाहेर हाकलून टाकावे, यासाठी महाराष्ट्रापासून जनजागरण अभियान सुरू केले आहे, असे चव्हाणके म्हणाले.
ते पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत आणि यामुळे हे घुसखोर बाहेर काढण्यासाठी राज्यामध्ये हे अभियान सुरू केले आहे. आज देशाच्या सीमेवर अवघे एक ते दीड हजार रुपये देऊन हे घुसखोर आपल्या देशामध्ये येत आहेत. नुकतेच आसाममधून तीन लाख बांगलादेशी बाहेर आले आहेत. मात्र ते परत बांगलादेशमध्ये न जाता महाराष्ट्रामध्ये आले आहेत. पन्नास रुपयांमध्ये हे आधारकार्ड मिळवत आहे आणि देईल त्या पैशांमध्ये ते काम करत आहेत. मात्र आज हे आपल्याकडे मिळेल तसे राहत असले तरी देखील उद्या आपल्या देशावर हक्क सांगतील. सरकारला यांच्यावर कारवाई करण्यासाठी भाग पाडावे म्हणून असे पद्धतीचे अभियान सुरू केले आहे. देशामध्ये हिंदुत्ववादी सरकार असतानाही अशा पद्धतीने दहा वर्षात हा प्रश्न सुटला नाही. त्यामुळे सरकारला जागे करावे, यासाठी हे अभियान सुरू केले आहे, असे चव्हाणके म्हणाले.