कर्जत तालुक्यातील राशीन येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वर्गीय बापूसाहेब देशमुख समर्थकांचा बुधवार, दि. २३ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता जिजाई मंगल कार्यालय, राशीन येथे भव्य संवाद मेळाव्याचे आयोजन युवक नेते राजेंद्र देशमुख यांनी केले आहे.
कर्जत तालुक्याच्या राजकारणात देशमुख गटाची ताकद निर्णायक असल्याने हा मेळावा उद्याच्या विधानसभेच्या दृष्टीने शक्ती प्रदर्शनासाठी आहे. एखाद्या वजनदार राजकीय पक्षातील प्रवेशासाठी आहे. कोणाला पाठिंबा जाहीर करण्यासाठी आहे की देशमुख कुटुंबातून कोणी विधानसभेची उमेदवारी करणार यासाठी आहे. याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. राजेंद्र देशमुख यांना विचारले असता ते म्हणाले, सर्व देशमुख समर्थक कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकत्र येऊन सर्वानुमते जो निर्णय घेतील त्या दृष्टीने पाऊल उचलले जाईल. मात्र त्यांनी नेमकी काय भूमिका घेणार हे मेळाव्यानंतरच जाहीर करू असे सांगितले आहे. राजेंद्र देशमुख यांनी सर्वांना बैठक व स्नेहभोजनासाठी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे. या मेळाव्यासाठी राशीन पंचक्रोशीसह तालुक्याचे विविध भागातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी