‘कोटा मेंटॉर्स’ची चौकशी करणाऱ्या विस्ताराधिकाऱ्यांच्या कामकाजाच्या चौकशीची मागणी

कर्जत : प्रा. किरण जगताप

संस्कार जगताप या विद्यार्थ्याचा कोटा मेंटॉर्स शाळेमध्ये दुसऱ्या इयत्तेत आरटीईमधून प्रवेश होऊनही १३००० रुपयांच्या फीची सक्तीने मागणी केल्याने पालक किरण जगताप यांनी २६ ऑगस्ट २०२३ रोजी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती. ७ विविध मुद्द्यांच्या आधारे केलेल्या तक्रारीची दखल घेऊन शिक्षण विस्तार अधिकारी उज्वला गायकवाड यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे सूचित केले होते. त्यानुसार २९ सप्टेंबर २०२३ रोजी विस्तार अधिकारी गायकवाड यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला. मात्र विस्तार अधिकाऱ्यांनी तक्रारीत दिलेल्या अनेक मुद्द्यांची चौकशी केली नाही तर काही मुद्द्यांची अपूर्ण चौकशी करण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने जगताप यांनी या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी शिक्षण विभागाकडे केली आहे.

भाग : ५

विस्तार अधिकारी यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना याबाबतचा अहवाल सादर केलेला आहे. त्यामध्ये आढळून येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बनावट सह्या, तक्रारदाराबाबत नोंदवलेले मत तसेच इतर बाबींवर जगताप यांनी जोरदार आक्षेप घेतले आहेत.

त्यात त्यांनी म्हटले आहे, २४ ऑगस्ट २०२३ रोजी कोटा मेंटॉर्स शाळेचे कार्यालयीन कर्मचारी अशोक आजबे यांनी पालक जगताप यांना फोन कॉल करून सक्तीने १३००० रुपयांच्या फीची मागणी केली होती. याबाबत अशोक आजबे यांनी माफी मागितली असल्याचे शिक्षण विस्तार अधिकारी यांनी सादर केलेल्या अहवालात नमूद केलेले आहे. मात्र आरटीईमधून प्रवेश होऊनही पालकांना कॉल करून सक्तीने पैशाची मागणी केल्याने बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ चे उल्लंघन झालेले आहे. ही बाब कारवाईस पात्र असतानाही चौकशीसाठी नेमलेल्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी त्यांच्या अहवालात ‘पालकाची तक्रार कमकुवत वाटते’, असे नमूद केलेले आहे. शाळेतील कर्मचाऱ्याने फिची सक्तीने मागणी केल्याच्या प्रकाराबाबत शिक्षण विभागाने भूमिका स्पष्ट केलेली नाही. याबाबत शिक्षण विभागाने शाळेवर योग्य कारवाई करावी.

पुढे त्यांनी म्हटले आहे, शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या शाळेच्या हजेरी पत्रकात तिसऱ्या क्रमांकावर श्रीम. धोदाड रोहिणी सुदाम या सहशिक्षिकेची सही व विस्तार अधिकारी यांच्याकडे दिलेल्या अभिप्रायावरील त्याच सहशिक्षिकेची सही यामध्ये मोठी तफावत आढळून येत आहे. त्यावरून विस्तार अधिकारी यांनी चौकशी दरम्यान बनावट कागदपत्रे स्वीकारल्याचे दिसून येत आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून त्याचा लेखी खुलासा शिक्षण विभागाने करावा व दोषींवर योग्य कारवाई करावी.

शाळेच्या इमारतीचा वापर शालेय कामकाजाव्यतिरिक्त इतर कामासाठी करण्यात येऊ नये असा शासनाचा आदेश आहे. मात्र शाळेतून गणवेश, पुस्तके व इतर शालेय साहित्याची विक्री करून शाळेतूनच दुकान चालवले जात आहे. त्याचा पुरावाच विस्तार अधिकाऱ्यांनी अहवालासोबत दिलेला आहे. अहवालासोबत त्यांनी शाळेतून क्रमिक पुस्तके विकल्याचा तपशील तसेच पालकांकडून घेतलेल्या पुस्तकांच्या फी बाबतची लेखी माहिती दिलेली आहे. या पुराव्यानुसार शाळेतून विद्यार्थ्यांना पुस्तकांची विक्री केली जात असल्याचे स्पष्ट होत आहे. यातून शासकीय नियमांचे उल्लंघन केले जात असल्याने शिक्षण विभागाकडून त्यावर कारवाई करण्यात यावी. तक्रारीमध्ये दिलेल्या मुद्द्यांची शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आलेली नाही. ही चौकशी का टाळण्यात आली ? याची सखोल चौकशी करण्यात यावी व कर्तव्यात कसूर केलेली आढळून आल्यास शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई करावी, असे तक्रारीत म्हटले आहे.

क्रमशः