अक्कलशून्य वाचाळवीरांनो, बाहेरच्याच्या मागे फिरु नका, माघारी फिरा : मारुती शिंदे

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत- जामखेडच्या माझ्या अभिमानी, स्वाभिमानी मतदार बंधू-भगिनींनो, आपल्या दोन्ही तालुक्यांतील काही अवकात नसलेले, चौकात बसलेले, घरात नको असलेले, व्हॉट्सॲप- फेसबुकवर दुसऱ्यांचे संदेश तिसऱ्याला न वाचता पाठवणारे अक्कलशून्य, उत्पन्नशून्य वाचाळवीरांना सांगू इच्छितो – थोडं भानावर या, थोडं डोकं ठिकाणावर ठेवा. विधानसभेची लढाई जितकी वर्चस्वाची आहे, त्याहून कित्येक पटींनी ती तुमच्या-आमच्या अस्तित्वाची झाली आहे, असे सामाजिक कार्यकर्ते मारुती शिंदे यांनी म्हटले आहे.

शिंदे पुढे म्हणाले, “आपल्या तालुक्यात बाहेरचा आमदार का नसावा हे थोडक्यात सांगतो. एखादी सावत्र आई आपल्या मुलाला चॉकलेट, बिस्किट किंवा मोकळे कंपास दिलं तर लगेच फोटो काढते, ते सुद्धा दुसऱ्याच्या खर्चातून. आणि सर्वांना दाखवते, ‘बघा मी मुलांना किती सांभाळते.’ मात्र खरी आई मुलांना दूध पाजते, जेवायला घालते, पोट भरलं की नाही याची खात्री करते, नजर लागू नये म्हणून पदर आडवा करते. कुणालाही फोटो काढून दाखवत नाही, कारण मुलं तिचीच असतात आणि ती मुलांची असते. म्हणूनच तालुक्याबाहेरच्या उमेदवारामागे फिरणाऱ्या मित्रांना सांगावंसं वाटतं, मोठा विचार करा. २०२४ ला आपल्या तालुक्यातला आमदार होणारच, पण त्याहून पुढे २०२९ ला आपल्या तालुक्यातील एखादी व्यक्ती बारामतीचा आमदार किंवा खासदार झाल्याशिवाय राहणार नाही, अशी जिद्द बाळगा. उगाच दुसऱ्याला ‘दादा’ म्हटलं तरी तो आपला होत नाही. म्हणूनच म्हणतोय, ‘अरे, मागे कसले फिरताय? माघारी फिरा.’ “