
कर्जत नगरपंचायतीत कार्यरत असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वारसांना सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी नगरसेवक भास्कर भैलुमे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

कर्जत ग्रामपंचायत कार्यकाळापासून स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या लिलाबाई कांबळे, कमल भिसे, विमल आखाडे, भामाबाई भैलुमे तसेच पूर्वी कार्यरत असलेल्या पार्वती कदम, सुशिला ओव्हळ आणि विमल लोढे यांनी आयुष्यभर तुटपुंज्या वेतनावर सेवा केली. त्यांच्या वारसांना सेवेत घेण्याच्या मागणीसाठी नगरपंचायत कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात नगरसेवक भास्कर भैलुमे, पाणीपुरवठा सभापती भाऊसाहेब तोरडमल, रविंद्र सुपेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि स्वच्छता कर्मचारी सहभागी झाले होते. आंदोलन सुरू असताना सचिन घुले पाटील आणि सुनिल शेलार यांच्या मध्यस्थीने नगरपंचायतीचे मुख्याधिकारी जायभाय यांनी आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन दिले. शासकीय परिपत्रकानुसार, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वारसांना सेवेत सामावून घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक घेऊन तातडीने कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

हे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर नगरसेवक भास्कर भैलुमे, पाणीपुरवठा सभापती भाऊसाहेब तोरडमल, रविंद्र सुपेकर यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, जर आश्वासनानुसार ठोस कारवाई झाली नाही, तर नगरपंचायत कार्यालयासमोर पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा नगरसेवक भास्कर भैलुमे यांनी दिला.
यावेळी गटनेते संतोष म्हेत्रे, उपगटनेते सतीश पाटील, सुनिल शेलार, दत्ता कदम, संतोष आखाडे, विजय साळवे, किशोर कांबळे, सुमित भैलुमे यांच्यासह नगरपंचायतीचे सर्व स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.