
कर्जत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी कर्जत नगरपंचायतीचे पाणीपुरवठा सभापती भाऊसाहेब तोरडमल यांनी काल (दि. २) नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते.

ऐन उन्हाळ्यात कर्जत शहर व उपनगरांतील नागरिकांना वेळेत आणि सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी भाऊसाहेब तोरडमल यांनी तीन महिन्यांपासून कर्जत नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत हा विषय उपस्थित केला होता. आगामी काळात पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचवून त्यांनी याबाबत लेखी सूचना दिल्या होत्या. तसेच मासिक बैठकीतही हा विषय मांडण्यात आला होता. मात्र, मुख्याधिकारी, नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांनी या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांना नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. या पार्श्वभूमीवर तोरडमल यांनी नगरपंचायतीच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडले.

रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरू होते. त्यानंतर, मुख्याधिकाऱ्यांनी स्टँडवर इलेक्ट्रिकल मोटर बसवणे, जलशुद्धीकरण केंद्रावर तुरटी आणि टीसीएल पावडर तसेच देखभाल साहित्य पुरवठा करणे, शहरातील सर्व गळती दुरुस्त करणे, आणि इतर आवश्यक कामे १५ दिवसांत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. तसेच, पाणीपुरवठा कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि अग्निशामक कर्मचारी यांचे पगार एक महिन्यात देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

या आंदोलनाच्या मध्यस्थीत मुख्याधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता अजिनाथ गीते, गटनेते संतोष म्हेत्रे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घुले, राष्ट्रवादीचे नेते सुनील शेलार, नगरसेवक भास्कर भैलुमे आणि रवींद्र सुपेकर यांनी सहभाग घेतला.
यावेळी उपगटनेते सतीश पाटील, दत्ता कदम, संतोष आखाडे, विजय साळवे, किशोर कांबळे, सुमित भैलुमे आणि कर्जत नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.