कर्जत नगराध्यक्षांवरील अविश्वास ठराव ; सोमवारची प्रतीक्षा !

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा उषा अक्षय राऊत यांच्याविरोधात नव्या अध्यादेशाच्या अनुषंगाने दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावामुळे जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांनी कर्जतचे प्रांताधिकारी पाटील यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच नगराध्यक्षा अविश्वास ठरावावर निर्णय घेण्यासाठी सोमवार, दि. २१ एप्रिल रोजी कर्जत नगरपंचायतीच्या सभागृहात विशेष सभा आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पूर्वी दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर चौकशी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांनी संबंधित नगरसेवकांना म्हणणे मांडण्यासंदर्भात नोटिसा बजावल्या होत्या. मात्र ती चौकशी आता रद्द करण्यात आली असून, नवीन अध्यादेशानुसार विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेमध्ये ठरावावर मतदान होईल आणि त्यानुसार नगराध्यक्ष पदावरून दूर करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

कर्जतच्या नगराध्यक्षा उषा राऊत यांच्याविरोधात सत्ताधारी ११ नगरसेवकांसह भाजपच्या २ अशा एकूण १३ नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे.

कर्जत नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची यांची एकहाती सत्ता आहे. १७ पैकी १५ जागांवर आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली विजय मिळवला होता. मात्र केवळ तीन वर्षांत राष्ट्रवादी आणि सहकारी काँग्रेस पक्षाच्या सत्ताधारी गटात पदवाटपावरून संघर्ष निर्माण झाला. ६ एप्रिल रोजी सत्ताधारी गटातील तब्बल ११ नगरसेवकांनी नगराध्यक्षा उषा राऊत यांच्याविरोधात एकत्र येऊन भाजपसोबत आघाडी केली.

नुकत्याच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत, नगरसेवकांचे बहुमत असल्यास ते नगराध्यक्षांना पदावरून दूर करू शकतात, असा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर बुधवार, दि. १६ एप्रिल रोजी कर्जत येथील १३ नगरसेवकांनी पुन्हा नव्याने जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला. यानंतर जिल्हाधिकारी यांनी नव्या निर्णयानुसार तात्काळ पुढील कार्यवाही सुरू केली आहे.