कुकडीचे आवर्तन लवकरच सुटणार : काकासाहेब धांडे

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यात सध्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्यापासून ते शेतीसाठीच्या उपयोगापर्यंत सर्व क्षेत्रांवर याचे तीव्र परिणाम जाणवू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर सभापती प्रा. राम शिंदे व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून कुकडी प्रकल्पाचे उन्हाळी आवर्तन लवकरच सुटणार असल्याची माहिती कुकडी सल्लागार समितीचे सदस्य काकासाहेब धांडे यांनी दिली आहे.

धांडे पुढे म्हणाले, गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प होते, त्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी घटली असून विहिरी, बोअरवेल कोरडे पडू लागले आहेत. या टंचाईमुळे अनेक गावांमध्ये जनावरांना आणि नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणेही कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर कुकडीचे आवर्तन सोडले जाणार आहे.

सभापती प्रा. राम शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे कुकडी, घोड आणि सिना या प्रकल्पांमधून आवर्तन सोडण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. धरणातील पाण्याच्या परिस्थितीचा अंदाज पाहून ते आवर्तन सोडण्याच्या सूचना देतील असेही धांडे यांनी म्हटले आहे.

पशुपालक व शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळावे. शेतातील पिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी हे आवर्तन अत्यावश्यक आहे. या महत्त्वाच्या विषयावर कोणीही राजकारण करू नये, असे आवाहन धांडे यांनी केले.