
कोविड काळात मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळवून देण्यात विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी बुद्रुक येथील ग्रामपंचायत कर्मचारी कै. दादासाहेब झुंबर श्रीराम हे पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून कार्यरत होते. २१ फेब्रुवारी २०२१ रोजी त्यांचा कोविड काळात मृत्यू झाला.

कोविड काळात स्थानिक स्वराज्य संस्थांतील कर्मचारी कर्तव्य बजावत असताना मृत्यू पावल्यास ५० लाख रुपयांचे विमा कवच/सानुग्रह अनुदान देण्याची योजना होती. त्यानुसार कै. दादासाहेब झुंबर श्रीराम यांचा प्रस्ताव जिल्हा परिषद, अहिल्यानगर येथून पाठवण्यात आला होता. मात्र, आजपर्यंत त्यांना न्याय मिळालेला नव्हता.
कै. दादासाहेब यांचे चिरंजीव सौरभ श्रीराम यांनी सभापती प्रा. राम शिंदे यांना या संदर्भात निवेदन दिले. प्रा. शिंदे यांनी संवेदनशीलता दाखवत ग्रामविकास मंत्रालय आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून या प्रकरणात लक्ष घातले. अर्थसंकल्पीय वर्षात ५० लाख रुपयांची देयके मंजूर करून, संबंधित कागदपत्रांची पूर्तता करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अहिल्यानगर यांच्यावर निश्चित करून आदेश काढण्यात आला आहे. प्रा. राम शिंदे यांच्या संवेदनशीलतेमुळे श्रीराम कुटुंबीयांना न्याय मिळाला आहे. त्याबद्दल त्यांनी प्रा. राम शिंदे यांचे आभार मानले आहेत.