
भाऊसाहेब देविदास रानमाळ. कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडी येथील वर्गमित्र. सैन्य दलात भरती झाला. देशसेवा करून सेवानिवृत्त झाला. सध्याच्या युद्ध परिस्थितीत जुन्या आठवणींना उजाळा देऊ लागला.

“कारगिल युद्धाच्या त्या पाच रात्र–पाच दिवसांत आम्ही एक क्षणही झोपलो नाही… थंडी, तणाव, आणि शत्रूचा दबाव असूनही मनात एकच भावना होती – भारत माता की जय !” — असं सांगताना माजी सैनिक भाऊसाहेब रानमाळ यांच्या डोळ्यांत आजही ते दिवस स्पष्टपणे झळकत होते.

रानमाळ यांनी भारतीय लष्कराच्या ३६ मराठा मिडीयम रेजिमेंटमध्ये १९९६ ते २०१८ या कालावधीत सेवा बजावली. दोन दशके देशाच्या संरक्षणासाठी वाहून घेतलेली ही सेवा, त्यांच्या आयुष्यातील केवळ कर्तव्य नव्हे तर अभिमानाचा पर्वणीचा काळ ठरला.
कारगिल युद्ध सुरू झाल्यानंतर त्यांची तैनाती राजस्थानमधील लोंगेवाल येथील पाकिस्तान सीमेजवळ करण्यात आली होती. “त्यावेळी स्थानिक नागरिकांनी मोठं सहकार्य केलं. त्यांच्या मदतीमुळे आमचं काम अधिक प्रभावीपणे पार पडलं,” असं ते आवर्जून सांगतात.

युद्धातील विजयानंतर मिळालेलं समाधान शब्दांत सांगता न येणारं आहे, असं सांगून ते पुढे म्हणाले, “देशासाठी काहीतरी केल्याचं समाधान आजही आयुष्यभर पुरेल असं आहे. तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात अभिमानास्पद होता.”
सध्या रानमाळ हे निवृत्त असूनही देशसेवेसाठी त्यांची भावना ताजीच आहे. अलीकडेच काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा सैन्यात सामील होण्याची तयारी दर्शवली आहे. “देशावर कोणतंही परकीय आक्रमण झाल्यास आपलं सैन्य सक्षम आहे. देशवासीयांनी चिंता न करता निश्चिंत राहावं,” असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.
तरुण पिढीला संदेश देताना भाऊसाहेब रानमाळ म्हणतात, “देशासाठी अभिमान बाळगा. शक्य असल्यास लष्करात सामील व्हा. देशसेवा ही सर्वोच्च सेवा आहे.”
