
कर्जत नगरपंचायतीत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या गटनेते पदाच्या वादावर अखेर शिक्कामोर्तब झाला असून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी घेतलेल्या निर्णयानुसार संतोष म्हेत्रे हेच कर्जत नगरपंचायतीचे अधिकृत गटनेते असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे कर्जत – जामखेडच्या राजकारणात सभापती प्रा. राम शिंदे यांची अधिक सरशी झाली आहे.

नगरसेवक अमृत काळदाते यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केला होता. त्यात त्यांनी आपली गटनेतेपदी नियुक्ती ग्राह्य धरावी व नगरसेविका प्रतिभा भैलुमे यांची उपगटनेतेपदी नियुक्ती करावी, असे म्हटले होते. परंतु जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी दि. २१ मार्च २०२५ रोजी हा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर काळदाते यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले. न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करत जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा सुनावणी देण्याचे आदेश दिले.

दि. ९ मे २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पुन्हा सुनावणी झाली. या सुनावणीतही अमृत काळदाते यांना आपल्याला गटनेतेपदी मान्यतेसाठी आवश्यक असलेले पुरावे सादर करण्यात अपयश आले. परिणामी जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा त्यांचा अर्ज फेटाळला. संतोष म्हेत्रे यांच्याकडे ११ नगरसेवकांचे लेखी समर्थन असल्याने त्यांची नियुक्ती वैध ठरवण्यात आली आहे. त्यामुळे आता संतोष म्हेत्रे हेच अधिकृत गटनेते राहणार आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे संतोष म्हेत्रेंच्या नेतृत्वाला कायदेशीर मान्यता मिळाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना
संतोष म्हेत्रे म्हणाले, माळी समाजाचे उपनगराध्यक्ष होऊ नये म्हणून विरोधक नेहमी कट कारस्थान करतात. ही निवड थांबवण्याचा प्रयत्न करतात. गेली तीस वर्षे झाले दुसऱ्या कोणत्याही माळी समाजाच्या व्यक्तीला पदाची संधी मिळू नये म्हणून विरोधक नेहमी प्रयत्न करत असतात.
राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी