
महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांची सोशल मीडियावर छायाचित्र व खोटे लिखाण वापरून बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे कर्जत तालुकाध्यक्ष दत्तात्रय महादेव नलवडे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.

दि. २० मे २०२५ रोजी सोशल मीडियावर सभापती प्रा. राम शिंदे यांचे छायाचित्र वापरून खोडसाळ पद्धतीने आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करण्यात आला. ही पोस्ट एका फेसबुक खात्यावरून प्रसारित झाली असून, ती खोटी, दिशाभूल करणारी व बदनामी करणारी असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

नलवडे यांनी सांगितले की, घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीविरोधात अशा प्रकारे सोशल मीडियावर खोडसाळपणे बदनामी करणे हा गंभीर प्रकार असून, त्यामुळे जनतेमध्ये चुकीचा संदेश जात आहे. या प्रकाराची चौकशी करून दोषींविरुद्ध २४ तासांच्या आत गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा आंदोलनात्मक पावले उचलण्यात येतील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. कर्जत पोलिसांना निवेदन देण्यासाठी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.