
जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत कर्जत तालुक्यातील कानगुडवाडीच्या वतीने स्त्री जन्माचे स्वागत, महिला ग्रामसभा, हळदी- कुंकू कार्यक्रम तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कर्जत पंचायत समितीच्या माजी सभापती अश्विनी श्याम कानगुडे यांनी भूषविले. या महिला ग्रामसभेमध्ये कानगुडवाडी गावात भ्रूणहत्या व गर्भलिंग निदान होऊ नये याबाबत ठराव करण्यात आला. तसेच गाव बालविवाहमुक्त करण्याची शपथही घेण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने गावात जन्माला आलेल्या मुलींचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. अश्विनी कानगुडे यांनी ग्रामसभेला मार्गदर्शन करताना गावातील मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन केले.


कार्यक्रमात विविध स्पर्धा घेण्यात आल्या असून, विजेत्या महिलांना कानगुडे यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. ग्रामसभेचे सचिव म्हणून ग्रामपंचायत अधिकारी विनियता पवार यांनी कामकाज पाहिले. या ग्रामसभेला गावातील महिला, गावपातळीवरील कर्मचारी तसेच महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


