
स्त्री जन्मतः सृजनशील, कर्तृत्ववान व हिम्मतवान आहे. अगदी मनू काळापासून म्हणजेच स्त्रीसत्ताक व्यवस्थेपासून ते आधुनिक काळापर्यंत समाज व संस्कृती निर्मिती तसेच रक्षणामध्ये अनमोल योगदान देणाऱ्या महिलांची असंख्य उदाहरणे सापडतात. भारतीय उपखंडातील महिलांचा इतिहासही गौरवशाली, संघर्षमय व परिवर्तनशील राहिलेला आहे.

प्राचीन वैदिक काळामध्ये स्त्रियांना उच्च स्थान होते. शिक्षण व धार्मिक विधींमध्ये सहभागी होण्याचे स्वातंत्र्य त्यांना होते. यामध्ये गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा यांसारख्या कर्तृत्ववान स्त्रियांचा समावेश होतो. मध्ययुगीन काळामध्ये महिलांची स्थिती मात्र खालावली. यामध्ये प्रामुख्याने सती प्रथा, पडदा पद्धत व बालविवाह यांसारख्या अनिष्ट रूढी बळावल्या. ब्रिटिश काळामध्ये विधवा पुनर्विवाहास मान्यता देऊन आणि सतीप्रथेवर बंदी घालून स्त्रीशिक्षणाची पुन्हा एकदा पायाभरणी करण्यात आली. आजच्या आधुनिक काळात मात्र स्त्रीने राजकारण, संरक्षण, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात गगनभरारी घेतली आहे. अशा प्रकारे महिलांचा इतिहास प्राचीन काळातील उच्च स्थान, मध्ययुगीन काळातील अधोगती व आधुनिक काळातील पुनरुत्थान असा राहिला आहे.

अगदी अनादी काळापासून ती मुलगी, बहीण, पत्नी आणि आई म्हणून स्वतःला सिद्ध करत आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे निसर्गचक्र चालवण्याची क्षमता तिच्यामध्ये आहे. आज समाज चंद्रावर पोहोचला असला, तरी तिच्या सर्जनशीलतेचा गुणाकार अजूनही कोणी करू शकलेला नाही, हेही तितकेच खरे आणि अभिमानास्पद आहे.


महाभारताच्या काळापासून आजपर्यंत स्त्रीचा अनेकदा स्वार्थासाठी वापर झाला, हे कटू असले तरी सत्य आहे. पतीसाठी डोळ्यावर पट्टी बांधून गांधारीने आयुष्यभर पतिधर्म पाळला. उर्मिलेचे आयुष्य लक्ष्मणाच्या प्रतीक्षेत गेले, तर रामासाठी सीतेने विनाकारण चौदा वर्षांचा वनवास भोगून अग्निपरीक्षा देत स्वतःला सिद्ध केले.

राज्यघटनेने स्त्रियांना समान अधिकार व स्वातंत्र्य दिले आहे. मात्र या स्वातंत्र्याचा गैरवापर तर होत नाही ना, याचा विचार करण्याची गरज आहे. आधुनिकतेच्या नावाखाली भरकटत चाललेल्या समाजाला योग्य दिशा दाखवण्याची आणि स्वातंत्र्य व स्वैराचार यातील फरक ओळखण्याची जबाबदारीही आजच्या स्त्रीवर आहे.
स्त्रीस्वातंत्र्य म्हणजे पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण नव्हे. उघडे-तोकडे कपडे घालणे, रात्री-अपरात्री घराबाहेर भटकणे, आधुनिकतेच्या नावाखाली वडीलधाऱ्यांचा अपमान करून कुटुंबव्यवस्था मोडकळीस आणणे किंवा “लिव्ह-इन”सारख्या प्रवृत्ती समाजात रुजवणे, ही स्त्रीस्वातंत्र्याची व्याख्या होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे तासनतास दूरदर्शनसमोर बसून निरर्थक मालिका पाहत राहणे आणि त्यातील भांडणे व कटकारस्थानांचे अनुकरण करणेही योग्य नाही.
यापेक्षा आपल्या मुलांना प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची ओळख करून देणे अधिक महत्त्वाचे आहे. सुनीता विल्यम्स, मदर तेरेसा, द्रौपदी मुर्मू यांसारख्या आदर्श व्यक्तींची माहिती मुलांना द्यावी. मोबाईलवरील सेलिब्रिटींच्या सजवलेल्या छायाचित्रांना ‘लाईक’ करण्यापेक्षा आपल्या मुलांचे उपजत कलागुण ओळखून त्यांना योग्य दिशा देणे आवश्यक आहे. दिवसभर स्वतःचे फोटो स्टेटसला ठेवून किती ‘लाईक्स’ मिळाले हे पाहण्यापेक्षा मुलांचे भविष्य उज्ज्वल कसे घडेल याकडे लक्ष देणे अधिक गरजेचे आहे.
स्त्रीने ठरवले तर ती क्षणात घडवूही शकते आणि बिघडवूही शकते, याला इतिहास साक्षी आहे. आज मोबाईलच्या आणि सिमेंटच्या जंगलात हरवत चाललेल्या पिढीला योग्य मार्गावर आणण्याची जबाबदारी समाजातील महिलांवर आहे, हे विसरून चालणार नाही.
म्हणूनच वास्तवाचे भान ठेवून शिक्षणाबरोबर संस्कार आणि संस्कृती जोपासणे, अंधश्रद्धा झुगारून देणे आणि विज्ञान व तंत्रज्ञानाची कास धरणे, हेच खरे स्त्रीस्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यांमधील फरक ओळखणे आज अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा “महिला दिन” साजरा करताना त्याचा खरा अर्थ हरवण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
महिला दिन हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित उत्सव नसून स्त्रीशक्तीचा सतत सन्मान करण्याची भावना आहे. कारण स्त्री ही जगाला घडवणारी, संस्कृती टिकवणारी आणि भविष्यातील पिढी घडवणारी जगज्जेती जननी आहे.

– प्रा. सुनिता सटाले- पावणे,
कर्जत

