
कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथे सालाबादप्रमाणे दि. २१ फेब्रुवारी २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विठ्ठल–रुक्मिणी अखंड हरिनाम सप्ताह तसेच संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा भक्तीमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. व्यासपीठ चालक भजनसम्राट हभप धोंडीराम शेटे कोरेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या सप्ताह दरम्यान दररोज महाराष्ट्रातील नावाजलेल्या विविध कीर्तनकारांचे जाहीर हरिकीर्तन पार पडले. तसेच ग्रामस्थांच्या वतीने दररोज महापंगतीचे आयोजन करून भाविकांची भोजन व्यवस्था करण्यात आली होती.
सप्ताहाच्या सांगता समारंभात हभप दयानंद महाराज कोरेगावकर यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यांच्या कीर्तनाला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठी उपस्थिती दर्शविली. यावेळी कै. शंकर शंभूराजे शेळके क्रीडा संकुल व कोरेगाव ग्रामस्थांच्या वतीने दयानंद महाराज यांच्या हस्ते गावातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते मनोज गरडकर, दत्ता महाडिक नारायणगावकर पुरस्कार विजेते वसंत चव्हाण, महाराष्ट्र कला भूषण पुरस्कार विजेत्या रेखा चव्हाण कोरेगावकर तसेच राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारी इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी जैनब फतेहमोहम्मद शेख यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

विशेष म्हणजे पंढरपूर येथील पांडुरंगाच्या चरणी अर्पण केलेला तुळशीचा हार दररोज कीर्तनासाठी आणण्यात येत असल्याने हा भक्तीभावाचा विषय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. तसेच टाळकरी आणि गायक म्हणून संत आत्मगिरी महाराज संस्था मांदळी येथील संपूर्ण संस्था या सप्ताहासाठी निमंत्रित करण्यात आली होती. संस्थाचालक ह.भ.प. दिलीप मुळे महाराज यांच्या प्रभावी गायनाने तसेच त्यांच्या संस्थेतील टाळकरी बाळ-गोपाळांच्या सादरीकरणाने उपस्थित ग्रामस्थांची मने जिंकली.
याशिवाय पंचक्रोशीतील विविध भजनी मंडळींनीही या सोहळ्यात सहभाग घेत भक्तिमय वातावरण अधिक रंगतदार केले. आठ दिवस भाविकांसाठी स्वादिष्ट व रुचकर महाप्रसादाची व्यवस्था शर्मा केटरिंग यांच्या वतीने करण्यात आली होती. हा महाप्रसाद आठ दिवस गावातील तरुणांनी उत्साहाने वाढला.


या यशस्वी आयोजनासाठी सर्व कीर्तनकार, भजनी मंडळी, काकडा, गाथा पारायण, हरिपाठ करणारे, महापंगतीसाठी योगदान देणारे ग्रामस्थ, देणगीदार तसेच मंडप, डेकोरेशन व जाहिरात सौजन्य देणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे आयोजकांनी आभार मानले.
ग्रामस्थांच्या एकोप्याने व सौजन्यपूर्ण सहकार्याने हा भक्तीमय महायज्ञ वर्षानुवर्षे असाच सुरू राहील आणि पुढील काळात आणखी भव्य स्वरूप धारण करेल, असा विश्वास सप्ताह समितीने व्यक्त केला.


