स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही भटके विमुक्त मूलभूत हक्कांपासून वंचित

कर्जत : प्रा. किरण जगताप

स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही भटके विमुक्त समाजाला अनेक मूलभूत हक्कांपासून वंचित राहावे लागत आहे. संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या ‘मुशाफिरी यात्रे’च्या माध्यमातून या समाजाची घरगणना व जनगणना प्रामुख्याने व्हावी, यासाठी मोठी जनजागृती केली जात आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागातून ही यात्रा भटके विमुक्त समाजाचे नेते ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या मुशाफिरी यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कर्जत तालुक्यातील माहिजळगाव, पाटेवाडी, हंडाळवाडी, कर्जत शहर, भांडेवाडी, राशीन, बाभुळगाव दुमाला, पिंपळवाडी व कुळधरण या भागांतील पालांवर, तांड्यांवर आणि झोपड्यांमध्ये जाऊन संघटकांनी बांधवांशी संवाद साधला.
सध्या देशात सरकारतर्फे घरगणना व जनगणना मोहीम सुरू असून जिल्हा परिषदेचे शिक्षक प्रत्येक गावात जाऊन ही नोंदणी करत आहेत. परंतु, गावाबाहेर, डोंगरात व जंगलात पालांमध्ये राहणाऱ्या भटके विमुक्त समाजाची घरगणना व जनगणना होत नाही, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. माहिजळगाव येथे उपजीविकेसाठी आलेले नाथपंथी डवरी गोसावी व वडार समाजाचे बांधव गेल्या ६ महिन्यांपासून पालामध्ये राहत आहेत. ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी त्यांच्याशी संवाद साधला असता, अद्याप एकही सरकारी कर्मचारी नोंदणीसाठी आला नसल्याचे समोर आले.

शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ या समाजाला मिळत नसल्याने त्यांना पोटासाठी भटकंती करावी लागत आहे. जर या समाजाची जनगणना झाली नाही, तर भविष्यात त्यांना भारताचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागेल, अशी भीती जाधव यांनी व्यक्त केली.


ग्रामीण विकास केंद्र संस्थेच्या सचिव उमाताई जाधव यांनी महिलांशी संवाद साधताना सांगितले की, सततच्या भटकंतीमुळे या महिलांचे आरोग्य धोक्यात आले असून मुलांच्या शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. सरकारने या समाजाची जनगणना करून त्यांच्यासाठी आरोग्य व शिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. संस्थेचे संचालक बापूसाहेब ओहोळ यांनीही देशातील संभाव्य नागरिकत्व कायद्यांचा दाखला देत, भटके विमुक्त समाज यातून सुटू नये म्हणून तात्काळ पावले उचलण्याची गरज प्रतिपादित केली. बाभुळगावचे सरपंच अमोल चव्हाण यांनी सभेला संबोधित करताना, गावातील भटके विमुक्त समाजाची घरगणना स्वतः शासकीय यंत्रणेला मदत करून १०० टक्के पूर्ण करून घेण्याचे आश्वासन दिले. तसेच या समाजाला घरकुल, शिक्षण, आरोग्य व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा शब्द दिला.


या यात्रेदरम्यान डवरी गोसावी, वडार, भिल्ल, पारधी, कैकाडी, तिरमली व मरीआईवाले या समाजातील शेकडो नागरिकांनी हजेरी लावली होती. या प्रसंगी तुकाराम पवार, शितलताई पवार, ललिताताई पवार, राहुल पवार, रेश्मा बागवान आदींनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष चव्हाण यांनी केले, तर आभार तुकाराम शिंदे यांनी मानले.