कर्जत -जामखेडमधील शेतकऱ्यांच्यावतीने आ. रोहित पवार यांचा भव्य नागरी सत्कार

कर्जत : प्रा. किरण जगताप

विनाअट सरसकट शेतकरी कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण संघर्षाला यश मिळाल्यानंतर कर्जत -जामखेडमध्ये शेतकरी बांधवांच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. बैलगाडीतून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने कर्जत आणि जामखेड शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने शेतकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.

सरकारने नुकताच सरसकट कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे कर्जत-जामखेड मतदारसंघातील सुमारे ६० हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याच पार्श्वभूमीवर कर्जत आणि जामखेडमधील शेतकरी बांधव आणि नागरिकांनी एकत्र येत आ. रोहित पवार यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

२०१९ मध्ये ‘महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजने’चा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना नव्या कर्जमाफी योजनेतून वगळण्याची अट तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळण्यासाठी २०२६-२७ या वर्षातील कर्ज नियमित भरण्याची अट अशा दोन जाचक अटी सरकारने घातल्या होत्या. या अटींमुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता होती.

या जाचक अटी हटवून विनाअट सरसकट कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी आ. रोहित पवार यांनी पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे रास्ता रोको आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले होते. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी केलेल्या या आक्रमक आणि सातत्यपूर्ण संघर्षानंतर सरकारने या जाचक अटी हटवून सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला. या निर्णयाचा राज्यातील सुमारे ३६ लाख शेतकऱ्यांना, तर कर्जत-जामखेड मतदारसंघातील सुमारे ६० हजार शेतकऱ्यांना लाभ झाला आहे.

दरम्यान, राज्याला सध्या अधिकृत विरोधी पक्षनेता नसला तरी विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावावी अशा पद्धतीने आ. रोहित पवार सातत्याने शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवत आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून ते विनाअट सरसकट कर्जमाफीच्या लढ्यापर्यंत त्यांनी केलेला संघर्ष याचे ठळक उदाहरण असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य नागरी सत्कारामुळे कर्जत आणि जामखेडमध्ये उत्साहाचे वातावरण होते. बैलगाडीतून निघालेल्या मिरवणुकीत शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ढोल-ताशांच्या गजरात आणि उत्स्फूर्त घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. मिरवणुकीनंतर झालेल्या नागरी सत्कार सोहळ्यात शेतकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी तालुक्यातील महाविकास आघाडीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.