
कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथील गट क्रमांक ११५ मधील शेतजमिनीत बसविण्यात आलेला सिंगल फेज डीपी आणि दोन विद्युत पोल तातडीने हटविण्यात यावेत अशी मागणी मंदाताई विकास गायकवाड यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीची दखल न घेतल्यास तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
मंदाताई गायकवाड यांच्या निवेदनानुसार, गट क्रमांक ११५, खाते क्रमांक १४४२ मधील १.२२ हेक्टर क्षेत्राच्या शेतजमिनीत कोणतीही पूर्वपरवानगी किंवा संमती न घेता सिंगल फेज डीपी आणि दोन विद्युत पोल उभारण्यात आले आहेत. त्यामुळे शेतीच्या दैनंदिन कामकाजात तसेच जमिनीच्या वापरात अडथळे निर्माण होत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. संबंधित डीपी आणि दोन्ही विद्युत पोल तातडीने हटवून शेतजमीन अडथळामुक्त करावी अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
या निवेदनाची प्रत महावितरणच्या कर्जत येथील संबंधित अधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात महसूल प्रशासन आणि महावितरण प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान प्रशासनाने या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा तहसीलदार कार्यालयात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा गायकवाड यांनी दिला आहे.



