
युवकांचे संघटन, जनतेची सेवा आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे ध्येय घेऊन कार्यरत असलेले शिवसेनेचे कर्जत तालुका प्रमुख डॉ. नितीन तोरडमल आणि शिवसेना युवासेनेचे उपशहरप्रमुख गणेश दिलीप जगताप यांनी वाढत्या फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. आर्थिक, जमीनविषयक तसेच सायबर फसवणुकीपासून नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

सध्या सामान्य नागरिक, शेतकरी, महिला आणि तरुणांना विविध प्रकारच्या आर्थिक व मालमत्ताविषयक फसवणुकीला सामोरे जावे लागत आहे. ऑनलाइन व्यवहार, यूपीआय फ्रॉड, बनावट गुंतवणूक योजना, नोकरीचे आमिष, खोटे कर्ज मंजुरीचे आश्वासन तसेच बनावट लॉटरीच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. याशिवाय जमिनीचे दुबार व्यवहार, बनावट सातबारा, खोटे खरेदीखत, वारसांच्या जमिनीची परस्पर विक्री, जमिनीच्या नोंदीत बेकायदेशीर फेरफार, अतिक्रमण आणि बनावट कुलमुखत्यारपत्र अशा प्रकारांमुळे अनेक नागरिकांची फसवणूक होत आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणताही आर्थिक किंवा जमीनविषयक व्यवहार करताना आवश्यक कागदपत्रांची अधिकृत पडताळणी करावी. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवून पैसे देऊ नयेत. अनोळखी लिंकवर क्लिक करू नये तसेच बँक खात्याची माहिती, ओटीपी आणि यूपीआय पिन कोणालाही देऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच बनावट सरकारी अधिकारी, सोशल मीडियावरील फसवणूक, विमा पॉलिसीच्या नावाखाली होणारी लूट, सावकारीच्या नावाखाली अवाजवी वसुली, खोट्या सह्या व शिक्के, बनावट सरकारी कागदपत्रे आणि धमकावून पैसे उकळणे यांसारख्या गंभीर गैरप्रकारांबाबतही नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
गणेश जगताप म्हणाले की कोणताही व्यवहार करताना कागदपत्रांची योग्य पडताळणी करा. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि कोणत्याही आर्थिक आमिषाला बळी पडू नका. कोणत्याही नागरिकावर अन्याय होत असेल किंवा त्याची फसवणूक झाली असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. युवासेनेच्या वतीने आम्ही नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू.
फसवणुकीला बळी पडल्यास वेळ न घालवता तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा तसेच सायबर आर्थिक फसवणूक झाल्यास १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण, फसवणुकीविरोधात जनजागृती आणि अन्यायग्रस्तांना मदत करण्यासाठी ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार डॉ. नितीन तोरडमल आणि गणेश जगताप यांनी व्यक्त केला आहे.

