अंबादास पिसाळ हे नेहमीच गद्दारी करतात

कर्जत : प्रा. किरण जगताप

अंबादास पिसाळ यांच्यासोबत आम्ही कायम होतो. जगदंबा कारखाना, कर्जत शहराची ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा बँक आणि नगरपंचायत अशा विविध निवडणुकांमध्ये आम्ही त्यांना १०० टक्के साथ दिली. आमच्या बहीरोबावाडी गावासह आम्ही सर्वजण कायम त्यांच्या पाठीशी उभे राहिलो. मात्र, भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला फसवण्याची भूमिका त्यांनी घेतल्याने आज आम्ही त्यांच्यासोबत राहिलो नाही.

गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून भाजपच्या उमेदवारांसोबत राहून त्यांनाच पाडण्याचा प्रयत्न अंबादास पिसाळ करत असल्याचे वारंवार समोर आले आहे. आताच झालेल्या विधानसभा, मार्केट कमिटी आणि नगरपंचायत निवडणुकीतही त्यांनी भाजपच्या उमेदवाराला फसवले. त्यांनी नेहमीच रोहित पवारांना पाठिंबा दिलेला आहे, असा आरोप भाजपाचे नेते सुनील यादव यांनी केला आहे.

यादव पुढे म्हणाले, मागील जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या वेळीही राम शिंदे साहेब अंबादास पिसाळ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. रोहित पवारांनी मतदानासाठी तयार केलेल्या समीकरणातील नऊ मते फोडून अंबादास पिसाळ यांना मतदान करण्याची भूमिका राम शिंदे साहेबांनी घेतली होती. अंबादास पिसाळ यांच्यामुळे राम शिंदे साहेब नाहीत, तर राम शिंदे साहेबांमुळे अंबादास पिसाळ आहेत, हे सिद्ध झाले आहे.

अंबादास पिसाळ यांनी दोन-दोन पंचवार्षिक विविध पदे भोगली. त्यांना निवडून आणण्यासाठी आमचे गाव शंभर टक्के त्यांच्या पाठीशी होते. मात्र, भाजपच्या उमेदवारांनाच फसवण्याचा त्यांनी चंग बांधल्याने आज त्यांच्यासोबत कोणीही राहिलेले नाही. त्यामुळे सर्वांनीच त्यांना पाडण्याचा निर्धार केला होता आणि जास्तीत जास्त मताधिक्याने त्यांना पराभूत करून दाखवले.

आम्ही भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत आहोत. आमची निष्ठा पक्षाशी आहे. अंबादास पिसाळ यांनीही पक्षाशी निष्ठावंत राहणे अपेक्षित होते. इथून पुढे त्यांनी पक्षात नीट राहून गद्दारी करू नये, असे सुनील यादव यांनी म्हटले आहे.