
कर्जत तालुक्यातील धालवडी येथे शिवस्मित दूध संकलन व शीतकरण केंद्राच्या वतीने दूध उत्पादक सभासदांना दिवाळीनिमित्त बोनस वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जगदंबा दूध डेअरी व यशोमय्या पतसंस्था, राशीनचे संचालक विवेक नारायण जगताप, भारतीय जनता पार्टीचे अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन कोपनर तसेच कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व शिवसेनेचे कर्जत तालुकाप्रमुख बळीराम यादव उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान धालवडीचे सरपंच पोपटराव पवार यांनी भूषविले. यावेळी धालवडीचे माजी सरपंच उमेश जगताप, संजय खोडवे, दत्ता चौधरी, बापूराव सुपेकर तसेच कुळधरणचे माजी सरपंच हेमंत गुंड यांच्यासह दूध उत्पादक सभासद उपस्थित होते.

या प्रसंगी केंद्रातील उत्कृष्ट दूध उत्पादक पहिल्या पाच सभासदांचा फेटा बांधून व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये उमेश जगताप यांनी प्रथम, बाळासाहेब सुपेकर यांनी द्वितीय, गणेश कोपनर यांनी तृतीय, वाल्मीक पवार यांनी चौथा, तर हनुमंत तांबे यांनी पाचवा क्रमांक मिळविला.
यावेळी जगदंबा दूध डेअरी व यशोमय्या पतसंस्थेचे संचालक विवेक नारायण जगताप म्हणाले, “दूध संकलन हा केवळ व्यवसाय नसून तो शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडित आहे. दिवाळीसारख्या पवित्र सणानिमित्त शेतकरी बांधवांना आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने बोनस देणे हा आदर्श उपक्रम आहे.”
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन कोपनर यांनी केंद्राचे चेअरमन गोकुळ पवार व शिवस्मित दूध संकलन केंद्राच्या सर्व संचालकांचे अभिनंदन केले. शेतकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्याबरोबरच भेसळमुक्त व उच्च प्रतीच्या दूध उत्पादनासाठी शेतकरी वर्गाने सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
केंद्राचे चेअरमन गोकुळ पवार म्हणाले, “शेतकरी बांधवांच्या सातत्यपूर्ण परिश्रमामुळेच केंद्राने प्रगतीचा टप्पा गाठला आहे. त्यांचे योगदान हेच आमचे बळ आहे. त्यांच्या कष्टांची दखल घेऊन दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी बोनस देण्यात आला आहे. आगामी काळातही दूध उत्पादकांना सर्वोत्तम दर व सुविधा देण्यासाठी केंद्र कटिबद्ध आहे.”
बोनस वितरणामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी सभासदांनी केंद्राचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लालासाहेब शेलार यांनी केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बोनसचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमानंतर सर्व सभासदांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते.

