औषध विक्रीतील नियमभंगाची तपासणी करा; अन्यथा ‘युक्रांद’चे घंटानाद आंदोलन

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील मेडिकल स्टोअर्स आणि हॉस्पिटलमध्ये औषधांची खरेदी, विक्री, साठवणूक व वापर शासनाच्या नियमांनुसार होत आहे की नाही, याची विशेष तपासणी मोहीम राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाच्या अहिल्यानगर कार्यालयाला निवेदन देण्यात आले असून, नियमभंग आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा युवक क्रांती दलाच्या वतीने अहिल्यानगर कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

मेडिकल स्टोअर्समध्ये वैध औषध विक्री परवाना, नोंदणीकृत फार्मासिस्टची उपस्थिती, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध विक्री, औषधांची खरेदी-विक्री बिले, साठा व नोंदी यांची तपासणी करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. तसेच कालबाह्य, बनावट किंवा भेसळयुक्त औषधांची विक्री होत नाही ना, औषधांची साठवणूक निर्धारित तापमानात केली जाते का, याचीही पडताळणी करण्याचे म्हटले आहे.
हॉस्पिटलमधील औषधांचा साठा, अधिकृत विक्रेत्यांकडून झालेली खरेदी, औषधांची मुदत, बॅच क्रमांक आणि रुग्णांच्या उपचारासाठी झालेला वापर यांची तपासणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. यापूर्वी वेळोवेळी निवेदने व चर्चा करूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाहीची माहिती मिळाली नसल्याचा आरोप निवेदनकर्त्यांनी केला आहे.
अन्न व औषध प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कर्जत तालुक्यात प्रत्यक्ष तपासणी मोहीम राबवावी आणि झालेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल द्यावा, असे निवेदन प्रा. किरण जगताप, अप्पा अनारसे, दादा राऊत, कमलाकर शेटे, गजेंद्र अनारसे यांनी दिले आहे.
या मागण्यांवर कार्यवाही न झाल्यास सोमवार, ३० नोव्हेंबर २०२६ रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या अहिल्यानगर येथील कार्यालयासमोर आक्रमक सत्याग्रही घंटानाद आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.