कोणत्या मुद्द्यांवर सुरु आहे कर्जतच्या ‘कोटा मेंटॉर्स स्कूल’ची तपासणी

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत शहरातील कोटा मेंटॉर्स स्कूलमध्ये शासनाने घालून दिलेल्या विविध नियमांचे व शासन आदेशांचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे पालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची लेखी तक्रार पालक किरण जगताप यांनी कर्जतच्या गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे.

भाग :

तक्रारीत त्यांनी म्हटले आहे, माझा मुलगा संस्कार हा स्कूलमध्ये दुसऱ्या इयत्तेत शिकत आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) त्याचा प्रवेश झालेला आहे. या कायद्यान्वये या विद्यार्थ्यांची शिकवणी शुल्क ही शासनाकडून भरली जाते. तरीही कोटा मेंटॉर्स स्कूलमधून मुलाच्या १३००० रुपयांच्या शैक्षणिक शुल्क वसुलीसाठी शाळेमधून तगादा लावला जात आहे. आरटीईमधून मोफत शिक्षण घेण्यासाठी प्रवेश झाला असूनही शाळेमधून फीच्या नावाखाली नियमबाह्य पद्धतीने आर्थिक लूट केली जात आहे.

भाग : १

पुढे त्यांनी म्हटले आहे, माझ्या पाल्यासाठी याच शाळेतून शालेय गणवेश (शर्ट, पँट, बुट) तसेच शैक्षणिक पुस्तके यांची सक्तीने खरेदी करायला लावली. त्यानुसार मी या सर्व शैक्षणिक साहित्याची खरेदी केली. या खरेदी वेळी पैसे भरलेल्या पावतीची मागणी केली, मात्र मला पावती देण्यात आली नाही. या शाळेतून पालकांना शैक्षणिक साहित्याची सक्तीने खरेदी करायला लावली जात असून या माध्यमातून पालकांची आर्थिक लूट केली जात आहे. पालकांनी कोणतेही शुल्क भरल्यानंतर पालकांना या शाळेतून विहित नमुन्यातील पावत्या दिल्या जात नाहीत.

दरम्यान, तक्रारीनंतर कर्जतचा शिक्षण विभाग खडबडून जागा झाला आहे. शिक्षण विभागाकडून कोटा मेंटॉर्स स्कूलच्या दप्तराची कसून चौकशी केली जात आहे. या कामासाठी विस्ताराधिकारी यांची विशेष नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून शिक्षण विभागाला तक्रारीच्या अनुषंगाने अहवाल सादर केला जाणार आहे.

तक्रारीत पुढे म्हटले आहे, या शाळेमध्ये शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना शैक्षणिक अर्हता पूर्ण नसतानाही कामावर घेतले जात आहे. कर्मचाऱ्यांना कायम स्वरूपातील व पूर्ण वेळ नियुक्ती दिली जात नसून शासन नियमानुसार नियुक्ती आदेश व वेतन दिले जात नाही. त्यामुळे कित्येक शिक्षक काही महिन्यांच्या कालावधीतच शाळा सोडून जात आहेत. त्यामुळे विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

क्रमशः