
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त भास्कर भैलुमे मित्र मंडळ, कर्जत तालुका आणि मोटार मालक-चालक संघटना, कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण कर्जत शहर तसेच कर्जत- राशीन- कर्जत या मार्गावर अंध, अपंग, कर्णबधिर आणि वयोवृद्धांसाठी १ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत मोफत प्रवास अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ कर्जत शहरातील पत्रकारांच्या हस्ते करण्यात आला.

पत्रकार गणेश जेवरे, सुभाष माळवे, किरण जगताप, मोतीराम शिंदे, मच्छिंद्र अनारसे, अफरोज पठाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

सालाबादप्रमाणे याही वर्षी कर्जत शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असून, सामाजिक उपक्रमांनी हा जयंती सोहळा साजरा करण्यात येत आहे. सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी भास्कर भैलुमे मित्र मंडळ आणि मोटार मालक-चालक संघटनेच्या वतीने पुढाकार घेतला जात आहे.

या उपक्रमाबद्दल कर्जत शहरातील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने गणेश जेवरे यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. यावेळी नगरसेवक भास्कर भैलुमे, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संतोष आखाडे, उपाध्यक्ष रोहन कदम, महेंद्र थोरात, खजिनदार कुंदन भैलुमे, बौद्धाचार्य गोदड समुद्र, अजय भैलुमे, मिलिंद आखाडे, सादिक कुरेशी, मुनिब बागवान तसेच भास्कर भैलुमे मित्र मंडळ व मोटार मालक-चालक संघटनेचे अतुल भैलुमे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष सोहन कदम आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.