माणसं ओळखण्याची कला !

कर्जत : प्रा. किरण जगताप

दररोज आपण अनेक माणसांना भेटतो. काही हसतात, काही मदत करतात, काही फसवतात. सर्वांच्या चेहऱ्यावर असलेले भाव, बोलण्यातला गोडवा, वागणुकीमागचे हेतू हे खरे असतातच असे नाही. कुणी आपलं होऊन आपल्या भावनांशी खेळतं, तर कुणी शांतपणे आपल्यासाठी खंबीरपणे उभं राहतं. खरं तर, माणूस ओळखणं ही एक कठीण पण अत्यावश्यक कला आहे. ही कला शिकली नाही, तर आयुष्यात नुकसान, पश्चात्ताप आणि ताणतणाव यांचं सावट कायम राहू शकतं.

माणसांची योग्य ओळख पटली नाही, तर व्यक्ती फसवणुकीस बळी पडते. अशा प्रसंगी तिला भावनिक, मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो. विश्वासात घेतलेली व्यक्तीच विश्वासघात करते, तेव्हा मनावर खोल आघात होतो. पश्चात्ताप निर्माण होतो आणि नात्यांमधील विश्वास डळमळीत होतो.

व्यक्तीचे वागणे, बोलणे, कृती आणि विचार यावरून तिचा खरा स्वभाव समजतो. फक्त गोड बोलण्यावर विश्वास ठेवणे धोकादायक असते. कृतीतील सातत्य, व्यवहारातील प्रामाणिकपणा आणि कठीण प्रसंगी दिलेली साथ यावरून त्या व्यक्तीचा खरा चेहरा उलगडतो. निरीक्षण, संयम आणि अनुभव यांच्या साहाय्याने माणसं ओळखण्याची कला आत्मसात करता येते.

अनुभव हा या प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग आहे. चुकांमधून शिकत गेल्यास पुढील वेळी अधिक सावधपणे निर्णय घेता येतो. प्रत्येक अनुभव माणसाला अधिक समजूतदार आणि व्यवहारकुशल बनवतो. अनुभवाची ही शिदोरी जीवनात अमूल्य ठरते.

आजच्या स्पर्धात्मक आणि गुंतागुंतीच्या जीवनशैलीत प्रत्येकाशी विचारपूर्वक वागणं आवश्यक झाले आहे. सगळेच हसतमुख असतात, पण प्रत्येकाच्या मनात काय चाललंय, हे समजून घेणं गरजेचं असतं. कोणावरही सहज विश्वास ठेवण्याऐवजी त्याच्या कृतीवर आणि विचारांवर लक्ष देणं केव्हाही सुरक्षित ठरतं.

माणसं ओळखणं म्हणजे केवळ शंका घेणं नव्हे, तर सजगतेने जगण्याची एक जीवनकला आहे. डोळस विचार, समंजस निर्णय आणि अनुभवातून घेतलेली शिकवण यामुळे ही कला आत्मसात करता येते. ही कला अवगत असल्यास समाजात अधिक सुरक्षित, समाधानकारक आणि सन्मानपूर्वक जीवन जगता येते, असे वाटते.