राशीन – व्यवहार शिकवणारे विद्यापीठ

कर्जत : प्रा. किरण जगताप

राशीनमध्ये प्रवेश करताच एक वेगळे विश्व समोर येते. कर्जत तालुक्यात वसलेले हे गाव पुस्तकी शिक्षणापेक्षा वेगळे काहीतरी शिकवते – ते म्हणजे व्यवहाराचे खरे शिक्षण. या राशीन विद्यापीठात दैनंदिन जीवनातूनच माणूस व्यवहारिक शहाणपण आत्मसात करतो. मात्र हे शहाणपण बहुतांशी स्वतःपुरते मर्यादित राहते. राशीन हे केवळ घरे आणि रस्त्यांचे गाव नाही, तर एका विशिष्ट जीवनशैलीचे प्रतिबिंब आहे, जिथे व्यवहाराला सर्वोच्च स्थान प्राप्त आहे.

येथील माणसे भेटल्यावर त्यांचे व्यवहारकौशल्य तात्काळ लक्षात येते. एखाद्याने काहीही नवीन करायची कल्पना मांडली, तर तेथील व्यक्ती प्रथम स्वतःचा लाभ पाहते. “मला यातून काय मिळेल ?”हा प्रश्न त्यांच्या मनात कायम असतो. कुणाला साहाय्य करायचे असेल, तरीही त्यामागे काही नफा आहे का ? हे आधी तपासले जाते. मग ती छोटी गोष्ट असो वा मोठा व्यवहार, सर्व काही मोजूनमापून पुढे जाणे हा इथला अघोषित नियम आहे. त्याचे कारण म्हणजे हे गाव १२ वाड्यांना जोडलेले आहे. येथे राज्यातील प्रसिद्ध असा जनावरांचा बाजार भरतो.

येथील लहान मुलेही बाजार भरवूनच आपले खेळ खेळतात. त्यामुळे व्यवहारिकतेचे बाळकडू त्यांच्यात रुजते. खेळ खेळतानाच येथील लहान मुले व्यवहाराचा प्राथमिक धडा शिकतात. काय करावे आणि काय करू नये, हे ठरवताना स्वतःचे हित प्राधान्याने पाहावे, हे व्यवहाराचे भान त्यांच्या स्वभावातच आपोआप भिनते.

राशीन येथे भरणारा आठवडे बाजार आणि जनावरांचा बाजार हा केवळ खरेदी- विक्रीची ठिकाणे नाहीत, तर व्यवहाराचे जिवंत शिक्षण देणारी केंद्र आहेत. येथे मधुर बोलून कुणाला प्रभावित करण्यापेक्षा गरज ओळखून व्यवहार पूर्ण केले जातात. संभाषण कधी मृदू, कधी कठोर, कधी स्पष्ट असते, परंतु त्यात स्वतःचा लाभ नेहमीच केंद्रस्थानी असतो. सौदेबाजी करताना येथील माणसे कधीही नुकसान सहन करत नाहीत, इतके ते कुशल बनलेले आहेत. अपवादाने नुकसान झालेच, तर त्याची सुरस कथा पुढच्या पिढीला सांगत राहतात. त्यांच्या अनुभव कथनातून नवीन पिढीला नवी दृष्टी प्राप्त होते.

येथील बाजारातून केवळ वस्तूच नव्हे, तर जीवन जगण्याची कला शिकायला मिळते. त्यामुळे येथे येणारी व्यक्ती आपली गरज ओळखते, किंमत ठरवते आणि मगच पुढील पाऊल उचलते. हे सर्व पाहिल्यावर हे स्पष्ट होते की, राशीन हे व्यवहाराचे एक मोठे विद्यापीठ आहे. जिथे प्रत्येक माणूस स्वतःच शिक्षक आणि विद्यार्थी दोन्ही आहे.

परंतु हे सर्व पाहताना एक गोष्ट ठळकपणे जाणवते. व्यवहाराच्या या प्रक्रियेत माणुसकी मागे पडते. आपुलकी, संवेदना किंवा दुसऱ्याची बाजू समजून घेणे याला फारसे स्थान राहत नाही. प्रत्येक गोष्ट स्वतःपुरतीच मर्यादित ठेवणे, हा त्यांचा स्वभावगुण बनलेला दिसतो. समाज म्हणून एकत्र राहण्यासाठी विश्वास, सहकार्य, सहानुभूती या गोष्टी आवश्यक असतात, मात्र येथे त्या फारशा आढळत नाहीत. प्रत्येक जण स्वतःचे हित पाहते, परंतु दुसऱ्याचे काय, याचा विचार येथे फारसा होत नाही. त्यामुळे माणूस घडतो खरा, परंतु समाज एकसंघ राहण्याची शक्ती यातून कमी होत असते. व्यवहारातून वैयक्तिक यश मिळवणे सोपे आहे, परंतु सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे येथे आव्हानात्मक ठरते.

राशीन येथील अनेक मित्रांच्या सहवासातून वेगवेगळे अनुभव येतात. व्यवहारीकता हा त्यांच्या स्वभावाचा बेस आहे, हे पदोपदी जाणवते. सामाजिक कार्याचे विषय त्यांना बोजड वाटतात. मात्र आपण त्यांच्याकडे अभ्यासपूर्ण दृष्टीने पाहायचे म्हटले तर खूप काही शिकायला मिळते. व्यवहारिकतेची प्रत्येक वेळी नवी दृष्टी देणारे हे चालते बोलते विद्यापीठ आपल्याला खूप काही शिकवून जाते.

राशीनचे एक वैशिष्ट्य कौतुकास्पद आहे. येथून घडलेली माणसे जगात कुठेही टिकून राहू शकतात. त्यांना कुणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासत नाही. त्यांच्यात कार्य करण्याची तयारी असते आणि कोणत्याही संकटातून मार्ग काढण्याची व्यवहारी बुद्धिमत्ता असते. राशीन विद्यापीठ त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास शिकवते, स्वावलंबी बनवते. ही शक्ती त्यांना कठीण परिस्थितीतही हार न मानता पुढे जाण्यास प्रेरणा देते. परंतु याच वेळी एक प्रश्न उद्भवतो – हे सर्व फक्त स्वतःसाठीच का ? स्वतःबरोबर दुसऱ्यालाही उभे करणे हेही तितकेच महत्त्वाचे नाही का?

मात्र, राशीन विद्यापीठ हे शिकण्याची मानसिकता असलेल्यांना महत्त्वाची शिकवण देत राहते. व्यवहार आणि माणुसकी यांचा समतोल साधणे आवश्यक असते ही सामान्य माणसाची भावना असते. स्वतःसाठी उभे राहणे महत्त्वाचे असते, परंतु दुसऱ्याला साहाय्य करणेही तितकेच गरजेचे असते. केवळ व्यवहाराने जीवन पुढे जात नाही, त्याला माणुसकीची जोड आवश्यक असते. माणसे जोडली गेली, तरच खरा समाज घडतो. राशीन हे व्यवहाराचे शिक्षण देणारे एक खास ठिकाण आहे, जिथे स्वावलंबन शिकता येते. परंतु त्याचबरोबर माणुसकी आणि समाजासाठी योगदान देण्याची भावना जोपासली गेली, तरच माणसे आणि समाज दोन्ही खऱ्या अर्थाने घडतील, असे वाटते.