
माझ्या आयुष्यात एका गावाने खोलवर ठसा उमटवला, तो म्हणजे कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडी – मामाचं गाव. बालपण इथेच घालवलं. या मातीने मला जगण्याचं बळ दिलं, आणि एकत्रितपणे संकटांचा सामना कसा करायचा, हे शिकवलं. गावकऱ्यांची एकी, नेतृत्वगुण, आणि समाजकारणातलं सक्रिय योगदान मला अजूनही भारावून टाकतं.

गावातली चैत्र पौर्णिमेची यात्रा म्हणजे आमच्यासाठी उत्सवांची पर्वणी. श्री भैरवनाथ हे गावाचं ग्रामदैवत. तलावाच्या काठावर वसलेलं टूमदार मंदिर, भक्ती आणि सौंदर्याचं प्रतीक. मंदिराच्या पायथ्याशी उभं राहिलं, की मन नकळत त्या दिवसांत रममाण होतं.

बालपणीच्या यात्रेच्या आठवणी तर आजही ताज्या वाटतात. चौथी- पाचवीत असताना, वार्षिक परीक्षा संपण्याच्या काळात येथील यात्रा असायची ! दहा- बारा दिवस आधीपासून मंदिर परिसर रंगवला जायचा. त्या पांढऱ्या रंगातली प्रसन्नता मनात घर करून बसायची. आम्ही मुलं, रंगकाम करणाऱ्या पेंटरला हातभार लावण्यासाठी उत्सुक असायचो. ते काम म्हणजे आमचं कौतुकाचं कारण.

पुढे योजना ठरायची – यात्रेला पैसे कसे जमवायचे, कुणाकडून मागायचे. मागच्यावर्षी दोन-पाच रुपये देणाऱ्याच्या दारात एक- दोनदा फिरून आठवण करून द्यायची आणि मग ३०-४० रुपये जमा करून आम्ही मोठी योजना आखायचो. यात्रेत मुलांना देण्यासाठी पाच रुपयांचा रेट ठरलेला असायचा. नातेवाईक नसलेला पण घरच्यांच्या ओळखीतला असेल, तर दोन रुपये तर मिळायचे !
तलावाच्या सांडव्यावरून आम्ही मंदिराकडे चालत जायचो. वाटेने जाताना मनात यात्रा, दुकानं आणि कुस्त्यांचे विचार घोळायचे. यात्रेत अगोदर मंदिरासमोर नारळ- पेढ्यांची दुकाने थाटली जायची. गावात दिगंबर (अण्णा) तोरडमल यांच्या दुकानाशेजारी खाद्यपदार्थ, खेळणी, सौंदर्यप्रसाधने, संसारोपयोगी वस्तूंची दुकानं लागायची. तिथेही आम्ही उगीचच इकडून तिकडं मिरवत असायचो. मित्रांमध्ये आळीपाळीने पैसे खर्च करून मेवा मिठाई खायचो. आज तुझी पाळी, उद्या माझी, असं ठरवून एक प्लेट सर्वांच्या तोंडात फिरायची. त्या गोडपणात मैत्रीचा ओलावा असायचा.
यात्रेच्या त्या गजबजाटात एक नाव नेहमीच उजळून निघायचं – बाळूचं हॉटेल. कर्जतचे हे प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक बहिरोबावाडीच्या यात्रेला खास मिठाईचा स्टॉल लावायचे. बर्फी, लाडू, चिवडा, गोडी शेव आणि बाळूमामांचं नेहमी कामात मग्न राहणं. त्या मिठाईइतकाच त्यांचा स्वभावही गोड. एवढ्या गर्दीतही खरेदी- विक्रीपेक्षा वेगळं काही बोलून ओळखीचा गोडवा जपणारे बाळूमामा, यात्रेच्या शेवटी चांगली कमाई करून समाधानानं परतायचे.
चैत्र पौर्णिमेच्या सायंकाळी गावकरी शेरणी वाटण्यासाठी मंदिरात जमायचे. गर्दी उसळायची. बाहेरगावचे भक्तही दर्शनासाठी यायचे. त्याच रात्री नर्तकींच्या कार्यक्रमाला धमाल यायची. गावात उत्साहाचं वातावरण असायचं. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी भैरवनाथ मंदिराच्या मागील बाजूला चंद्रहार जाधव व मंडळींचा धमाल विनोदाचा हजेरीचा कार्यक्रम व्हायचा. गावातील मोठ्या संख्येने लोक येथे जमत. चांगली करमणूक आणि समाज प्रबोधन होतं.
त्याच दिवशी सायंकाळी कुस्त्यांचा थरार असायचा ! कर्जत मार्गावरील भल्या मोठ्या चिंचेच्या झाडाखाली कुस्त्यांचा फड रंगायचा. आम्ही लहान मुलं, लवकर पोचून आपली ‘रेवड्यावरची’ कुस्ती रंगवायचो. मग मोठ्यांची कुस्ती आणि बक्षीसांचा जल्लोष व्हायचा.
त्या कुस्त्या, ते लहानसहान हिशोब, ते निरागस हास्य- हे सगळं आठवलं की काळ पुन्हा जिवंत होतो. यात्रेची सांगता झाली तरी मन मात्र अजूनही तिथंच रेंगाळत राहतं.
आजही श्री भैरवनाथाची यात्रा आली, की आठवणी मनाच्या कपाटातून डोकावतात. त्या मातीशी नातं पुन्हा घट्ट होतं. आणि पुन्हा एकदा त्या यात्रेत हरवून जायची अनामिक ओढ निर्माण होते. त्या मातीशी आपण एकरूप असल्याचा आनंद दरवळत राहतो.
