
दरवर्षी घेण्यात येणाऱ्या मंथन व लक्षवेध परीक्षांमध्ये रेहेकुरी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे. शाळेतील दोन विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत, तर दोन विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.

यामध्ये इयत्ता पाचवीतील समृद्धी महेश मांडगे हिने मंथन परीक्षेत राज्यात तिसरा, तर लक्षवेध परीक्षेत अकरावा क्रमांक मिळवला आहे. इयत्ता दुसरीतील वेदिका विनोद पवार हिने मंथन परीक्षेत पाचवा, तर लक्षवेध परीक्षेत सातवा क्रमांक मिळवला आहे.
इयत्ता पाचवीतील मानसी ईश्वर मांडगे हिने मंथन परीक्षेत जिल्हास्तरावर पहिला, तर लक्षवेध परीक्षेत राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. राजवीर राहुल गोरे याने मंथन परीक्षेत जिल्हास्तरावर दुसरा क्रमांक मिळवून शाळेची मान उंचावली आहे.
या विद्यार्थ्यांच्या यशामुळे जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, रेहेकुरीने राज्य व जिल्हा स्तरावर आपली छाप उमटवली आहे. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवीसाठी शिक्षिका मनीषा रायकर व इयत्ता दुसरीसाठी शिक्षिका रूपाली पळसकर यांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व पालक यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.