संस्कृती टिकवण्यासाठी ‘माता’ ; जीवसृष्टी वाचवण्यासाठी ‘माती’ अत्यावश्यक

कर्जत : प्रा. किरण जगताप

माता आणि माती पुन्हा मिळणार नाहीत. त्यामुळे पुढच्या पिढीने आपली संस्कृती जपली पाहिजे. संस्कृती टिकवण्यासाठी ‘माता’ आणि जीवसृष्टी वाचवण्यासाठी ‘माती’ अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन पद्मश्री बीजमाता राहिबाई पोपेरे यांनी केले.

कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे साई बालाजी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘स्वाभिमानी माऊली पुरस्कार वितरण व कीर्तन सोहळा’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या सहा मातांना ‘स्वाभिमानी माऊली पुरस्कार’ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

पुरस्कारप्राप्त महिलांमध्ये ताराबाई अमृता कुलांगे (राळेगण म्हसोबा), चंद्रभागा महादेव गाडीलकर (पळवे खुर्द), सुरेखा शिवाजी राहिंज (मिरजगाव), यमुनाबाई रावसाहेब कर्पे (वालवड), केशरबाई बापू जवणे (बाभूळगाव खालसा), शालन बापू कांबळे (रवळगाव) यांचा समावेश होता.

कार्यक्रमाला हभप काशिकानंद महाराज (शिर्डी), सदगुरू उद्योग समूहाचे अध्यक्ष डॉ. शंकरराव नेवसे, साई बालाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष हभप राजेंद्र महाराज गोरे, अर्चनाताई गोरे, संदीप केदारी, हभप सोपान महाराज जोगदंड, रविंद्र महाराज सुद्रीक, माजी जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडुळे, मिरजगावच्या सरपंच सुनिता नितीन खेतमाळस, प्राचार्य राजळे, प्रा. जयंत म्हेत्रे यांच्यासह ग्रामस्थ, महिला भगिनी व बाल वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काशिकानंद महाराज म्हणाले, आज माणूस पैशाच्या मागे धावतो आहे. पैसा म्हणजे सर्व काही, अशी समजूत होऊ लागली आहे. परंतु संस्कारामुळेच माणूस देवत्वाकडे वाटचाल करतो. आई-वडील आपल्या मुलांवर चांगले संस्कार करतात, म्हणून त्यांच्या ऋणातच जीवन घडते. आई-वडिलांची सेवा करणाऱ्याला दुसऱ्या कुठेही जाण्याची गरज भासत नाही. आई- वडील हेच खरे तीर्थक्षेत्र आहेत. हभप राजेंद्र गोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.