
कर्जत तालुक्यातील दुरगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. भीम जयंती उत्सव समिती, दुरगाव यांच्या वतीने आयोजित या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरात एकूण ७९ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.

या शिबिरात फिजिओथेरपी विभागामार्फत मान, पाठ, कंबर, गुडघेदुखी, सांधे दुखी, मणक्याचे आजार, पक्षाघात, स्नायू दुखणे, स्पॉन्डिलायटिस, पॅरलिसीस, शारीरिक तंदुरुस्ती व्यायाम यासंदर्भात तज्ज्ञांकडून सल्ला व उपचार करण्यात आले. ब्लड प्रेशर, शुगर, हृदयरोग कसे टाळावे तसेच लहान मुलांचे आहार व आरोग्य तसेच स्त्री रोग यांची काळजी कशी घ्यावी, या संदर्भात विशेष मार्गदर्शन करण्यात आले.
या आरोग्य शिबिरात डॉ. सुदर्शन जाधव, डॉ. मधुकर कोपनर, डॉ. निखिल नेटके, डॉ. आशिष चौधरी, डॉ. अक्षय गोरे, डॉ. मयूर नेटके, डॉ. मृणालिनी जाधव, डॉ. योजना कोपनर, डॉ. अंकिता नेटके व डॉ. जागृती चौधरी या तज्ज्ञ डॉक्टरांनी सेवा बजावली. या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.