परीटवाडी शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील परीटवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता सातवीच्या २००१ च्या बॅचचा स्नेहमेळावा नुकताच मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला. तब्बल २४ वर्षांनंतर माजी विद्यार्थी एकत्र येऊन आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत शाळेतील दिवस पुन्हा अनुभवले.

या मेळाव्यात शाळेतील मस्ती, एकत्रित अभ्यास, शिक्षकांचा वचक, क्रीडा स्पर्धा, स्नेहसंमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रम, शिक्षकांनी दिलेली शिस्त आणि शिक्षणपद्धती अशा अनेक आठवणींवर गप्पांचा फड रंगला. सर्व माजी विद्यार्थी जुन्या आठवणीत इतके रममाण झाले होते की क्षणभरासाठी त्यांनी आपल्या व्यस्त जीवनातील जबाबदाऱ्या विसरून पुन्हा त्या बालसुलभ वातावरणात रमण्याचा आनंद घेतला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक मुरलीधर शहाणे होते. दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर उपस्थित शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिमन्यू वाघ यांनी केले. सूत्रसंचालन गोरख लाहोर यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रवीण शहाणे यांनी केले.

या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी गोरख लाहोर, योगेश गायकवाड, गोरख सपाटे, छाया काळे, ज्ञानेश्वर पंडित या माजी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्वांनी आपापला परिचय करून दिला आणि शाळेतील काही गमतीदार, तर काही हृद्य आठवणींना उजाळा दिला. यावेळी प्रार्थना व हजेरी घेण्यात आली, ज्यातून जुन्या काळाच्या आठवणी अधिकच सजीव झाल्या.

माजी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये यश संपादन केले असून त्यामागे शाळेचे संस्कार आहेत, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. पूर्वीच्या ओसाड माळरानावर वसलेली ही शाळा आज लोकसहभाग, शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थ आणि शिक्षकांच्या सहभागातून नंदनवन झाली आहे, हे पाहून सर्वांचे मन आनंदाने भरून आले.

या स्नेहमेळाव्यास माजी मुख्याध्यापक मुरलीधर शहाणे, माजी शिक्षण विस्तार अधिकारी गीता ससाने, शिक्षिका शांताबाई चोपडे, विजय व्यवहारे, पाराजी सातपुते, हनुमंत येवले आदी शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमास गोरख लाहोर, योगेश गायकवाड, गोरख सपाटे, महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत सचिन आडबल, छाया काळे, मीनाक्षी गवळी, ज्ञानेश्वर पंडित, अभिमन्यू वाघ, तुकाराम सपाटे, सचिन गवळी, कैलास कदम, बाळू काळे, महादेव सपाटे, भाऊ गवळी, बापू सायकर, सचिन लाहोर यांच्यासह २००१ च्या बॅचचे सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर सर्वांनी एकत्र भोजनाचा आनंद घेतला. यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेला आवश्यक वस्तू भेट देण्याचा संकल्प केला. विशेष म्हणजे माजी शिक्षक पाराजी सातपुते यांनी ३० माजी विद्यार्थिनींना साड्या भेट देऊन सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.