पुस्तकासमोर नतमस्तक व्हा ; तरुणांनी सुवर्णकाळाचा सदुपयोग करावा : सविता गोलेकर

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयात वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त ‘मराठी भाषा गौरव दिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मराठी विभाग व शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी व्याख्यात्या सविता गोलेकर म्हणाल्या की, युवा पिढी ही समाजाचा केंद्रबिंदू आहे. तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताना भरकटू नये. मौजमस्ती म्हणजेच आयुष्य नव्हे. सोशल मीडियाच्या विळख्यात तरुणाई अडकत चालली असून जीवनातील सुवर्णकाळाचा योग्य उपयोग करणे आवश्यक आहे. विचार, घडण आणि कर्तृत्व हे चिरकाल टिकणारे असते. आपल्या हिताचे स्वीकारून कलागुणांची ओळख करून आत्मपरीक्षणाच्या माध्यमातून यशाचे शिखर गाठावे. पुस्तकासमोर नतमस्तक व्हा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. प्रमोद परदेशी होते. त्यांनी भाषेचे महत्त्व अधोरेखित करत मातृभाषेला सर्वोच्च स्थान दिले पाहिजे, असे मत व्यक्त केले. भाषेमुळेच मानवाचा विकास झाला असून विचार आणि भावना व्यक्त करणारे लेखन म्हणजे साहित्य होय, असे ते म्हणाले.

प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. प्रास्ताविक प्रा. सुखदेव कोल्हे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. भारती काळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. सीमा डोके यांनी केले. यावेळी प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.