राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात जिल्हास्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

कर्जत : प्रा. किरण जगताप

राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी एकदिवसीय जिल्हास्तरीय व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा उत्साहात पार पडली. “महापुरुषांचे कार्य विवेचन” हा कार्यशाळेचा मुख्य विषय होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यकारी विश्वस्त डॉ. प्रविण सप्तर्षी होते. प्रमुख वक्ते म्हणून मा. श्री. आप्पा अनारसे व प्रा. शाहूराव पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. दिलीपसिंह निकुंभ यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. संदीप काळे यांनी मानले.

प्रास्ताविकात डॉ. निकुंभ यांनी सांगितले की, “महापुरुषांचे जीवन हे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शक आहे. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा अभ्यास केल्यास व्यक्तिमत्त्व विकासाची भक्कम पायाभरणी होते.” त्यांनी शिक्षणासोबत मूल्यसंस्कारांची जोपासना करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

प्रमुख वक्ते मा. श्री. आप्पा अनारसे यांनी आपल्या प्रभावी भाषणात नमूद केले, “महापुरुषांनी समाजहितासाठी केलेले कार्य हे त्याग, निष्ठा आणि ध्येयवेड यांवर आधारित होते. आजच्या युवकांनी या गुणांचा अंगीकार केल्यास समाजपरिवर्तन शक्य आहे.” त्यांनी युवकांना सकारात्मक दृष्टिकोन आणि नेतृत्वगुण विकसित करण्याचे आवाहन केले.

प्रा. शाहूराव पवार यांनी महापुरुषांच्या कार्याचे समाजशास्त्रीय विश्लेषण करताना सांगितले, “व्यक्तिमत्त्व विकास म्हणजे केवळ करिअर घडवणे नव्हे; तर सामाजिक जाणीव, नैतिक मूल्ये आणि जबाबदारीची भावना जोपासणे होय.” त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनसंस्कृती वाढवून विचारसमृद्धी साधण्याचे मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय समारोपात डॉ. प्रवीण सप्तर्षी यांनी सांगितले, “शिक्षणसंस्था या संस्कारांची कार्यशाळा आहेत. महापुरुषांचे विचार आत्मसात केल्यास युवकांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकी दृढ होते.”

या कार्यशाळेस विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापकवर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या कार्याचा सखोल अभ्यास करण्याची आणि त्यातून प्रेरणा घेण्याची संधी लाभली. राष्ट्रीय सेवा योजना विभागाने कार्यशाळेचे नियोजन व आयोजन उत्कृष्टरीत्या पार पाडले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. संदीप काळे यांनी केले.