माधव जठार यांची युवासेना कर्जत तालुका प्रमुखपदी निवड

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यात युवकांमध्ये सक्रियपणे काम करणारे तरुण कार्यकर्ते माधव जठार यांची युवासेना कर्जत तालुका प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे तालुक्यातील युवासेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मुंबई येथे झालेल्या बैठकीत युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, युवासेना सचिव किरण साळी तसेच युवासेना जिल्हाप्रमुख अभिषेकराजे भोसले यांच्या उपस्थितीत माधव जठार यांची कर्जत तालुका प्रमुखपदी अधिकृत निवड जाहीर करण्यात आली. यावेळी युवासेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या प्रसंगी युवासेना शहरप्रमुख अमित माने, हनुमंत अनारसे, सुदाम गदादे, अक्षय खराडे, सावता अनारसे आणि ऋषी क्षीरसागर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी माधव जठार यांचे अभिनंदन करून आगामी काळातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

माधव जठार यांनी आतापर्यंत युवकांमध्ये राहून विविध सामाजिक उपक्रम, जनजागृती मोहिमा तसेच पक्षाच्या संघटनात्मक कामात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. युवकांशी असलेला त्यांचा सातत्यपूर्ण संपर्क, संघटन कौशल्य आणि पक्षनिष्ठा लक्षात घेऊन त्यांची या महत्त्वाच्या पदावर निवड करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, आगामी काळात कर्जत तालुक्यात युवासेनेच्या शाखा अधिक सक्रिय करण्यावर भर देण्यात येणार असून ग्रामीण भागातील युवकांना संघटनेशी जोडण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे माधव जठार यांनी सांगितले. युवकांच्या प्रश्नांवर आवाज उठवणे, सामाजिक उपक्रम राबवणे आणि संघटना अधिक बळकट करणे यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

त्यांच्या या निवडीमुळे कर्जत तालुक्यात युवासेनेच्या कार्याला नवचैतन्य मिळेल, असा विश्वास पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.