
शेतात जाण्यासाठीचा वहीवाटीचा रस्ता मंजूर होऊनही तो प्रत्यक्षात खुला करण्यात आला नसल्याच्या निषेधार्थ कर्जत तालुक्यातील आखोणी येथील शेतकरी रामभाऊ बापू सायकर यांनी पत्नी, मुले तसेच शेळ्या व म्हैस यांच्यासह कर्जत तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

रामभाऊ सायकर यांनी शेतात जाण्यासाठी रस्ता मिळावा, यासाठी कर्जत तहसीलदारांकडे न्याय मागितला होता. या प्रकरणात तहसीलदारांनी सायकर यांच्या बाजूने निर्णय देत रस्ता खुला करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी रस्ता खुला करण्यासाठी घटनास्थळी गेले होते. मात्र, विरोधी पक्षकाराने हरकत घेतल्यामुळे रस्ता खुला होऊ शकला नाही.

यानंतर सायकर यांनी पोलीस बंदोबस्तात रस्ता खुला करण्यासाठी आवश्यक चलनही भरले. १३ मार्च २०२६ आणि २८ मे २०२६ रोजी तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी व इतर कर्मचारी रस्ता खुला करण्यासाठी घटनास्थळी गेले. मात्र, त्या वेळीही विरोधी पक्षकाराने शासकीय आदेशाचे पालन केले नाही. त्यामुळे रस्ता खुला होऊ शकला नाही.
रस्ता उपलब्ध नसल्यामुळे शेतीची कामे रखडली असून, त्यामुळे आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे रामभाऊ सायकर यांनी सांगितले. महसूल विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे आणि तहसीलदारांच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने हे आमरण उपोषण सुरू केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपाचे नेते सुनील यादव यांनी आंदोलनस्थळी जाऊन सायकर यांना पाठिंबा दिला आहे.
तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित मंडल अधिकारी व तलाठी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. तसेच, तहसीलदारांच्या आदेशाचा अवमान करणाऱ्या विरोधी पक्षकाराविरुद्ध महसूल विभागाने गुन्हा दाखल करून तातडीने शेतरस्ता खुला करावा, अशी मागणी रामभाऊ सायकर यांनी केली आहे.
शेतकऱ्याच्या बाजूने तहसीलदारांचा निकाल लागून मंडळ अधिकारी, तलाठी आदेश पाळत नाहीत म्हणजे कुठेतरी पाणी मुरत आहे. तहसीलदारांनी ठोस भूमिका घेऊन शेतकऱ्याला लगेच न्याय द्यायला पाहिजे. न्याय मिळाला नाही तर मी शेतकऱ्याच्या बाजूने उभा राहून रस्ता करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
सुनील यादव, भाजप नेते

