कुळधरण येथील अवैध दारूविक्रीवर कर्जत पोलिसांचा छापा

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील हॉटेल पृथ्वीराज परिसरात पोलिसांनी छापा टाकून देशी-विदेशी दारूच्या १० सीलबंद बाटल्या जप्त केल्या. या कारवाईत २ हजार ५० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, पृथ्वीराज बन्सी सुपेकर (रा. कुळधरण) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्जत पोलिसांचे पथक कुळधरण बीटमध्ये कर्तव्य बजावत असताना, हॉटेल पृथ्वीराज परिसरात अवैध दारूविक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी जाऊन खात्री करत छापा टाकला.

झडतीदरम्यान पोलिसांना मॅकडॉल नंबर वन कंपनीच्या १८० मिलिलिटर क्षमतेच्या १० सीलबंद बाटल्या आढळल्या. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल निलेश गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलीस हवालदार मनेश शिंदे करीत आहेत.