
कर्जत तहसील कार्यालयात माहिती फलकांचा अभाव असल्याने नागरिकांची सर्रास गैरसोय होत आहे. चक्क तहसीलदारांच्या दालनालाच नामफलक नाही. आवक- जावक कक्ष, स्वच्छतागृह, नागरिकांची सनद, कार्यालयीन वेळ व शासनाने बंधनकारक केलेले अनेक फलक गायब आहेत. त्यामुळे तहसीलदारांना भेटायचे कुठे, अर्ज- टपाल सादर करायचे कुठे, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. शासकीय कार्यालयात मूलभूत माहिती मिळवण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागणे, ही गंभीर बाब आहे.

तहसील कार्यालयातील स्वच्छतागृहाजवळ कोणताही फलक नसल्याने नागरिकांना स्वच्छतागृह नेमके कोठे आहे याची माहिती मिळत नाही. त्यामुळे नागरिक कार्यालयाच्या मागील बाजूस लघुशंकेला जाताना दिसतात. त्यामुळे तहसील कार्यालय परिसरात कमलीची अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरलेली दिसत आहे. नागरिकांच्या सुविधांकडे इतके दुर्लक्ष होत असेल, तर कार्यालयीन व्यवस्थापन नेमके करते तरी काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

माहितीचा अधिकार अधिनियम व विविध शासन आदेशानुसार शासकीय कार्यालयांनी महत्त्वाची माहिती स्वयंस्फूर्तीने उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. मात्र कर्जत तहसील कार्यालयातील परिस्थिती शासन करत असलेल्या पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.

नागरिकांना साधे माहिती फलक उपलब्ध करून देण्यातही प्रशासनाला अपयश येत असेल, तर जबाबदार अधिकाऱ्यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. वरिष्ठ महसूल अधिकारी या प्रकाराची दखल घेऊन तातडीने सुधारणा करणार का, हा प्रश्न आहे. कार्यालयाचे प्रमुख म्हणून तहसीलदार रवी सतवन हे या गंभीर बाबींकडे कितपत गांभीर्याने पाहतात आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी कोणती ठोस कारवाई करतात, याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.

