
दुष्काळी परिस्थितीत वन्यजीवांना पिण्याचे पाणी आणि नैसर्गिक चारा उपलब्ध करून देण्यासाठी वनविभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात. अन्यथा पाणी व अन्नाच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्त्यांकडे वळून मानव-वन्यजीव संघर्ष वाढण्याची शक्यता आहे, असा इशारा जैवविविधता व वन्यजीव संशोधक डॉ. रणजित रावसाहेब राऊत यांनी दिला.

डॉ. राऊत यांनी रेहेकुरी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयास भेट देऊन वनपरिक्षेत्र अधिकारी मूळे यांच्याशी चर्चा केली. यावेळी रेहेकुरी काळवीट अभयारण्य आणि माळढोक पक्षी अभयारण्य परिसरातील पाणवठ्यांची प्रत्यक्ष पाहणी करून पाण्याच्या उपलब्धतेचा आढावा घेण्यात आला.

दुष्काळामुळे नैसर्गिक जलस्रोत कोरडे पडत असल्याने वन्यजीवांसमोर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे पाणवठ्यांमध्ये नियमित पाणी भरणे, त्यांची स्वच्छता व देखभाल करणे आणि नैसर्गिक चाऱ्याचे नियोजन करणे आवश्यक आहे, असे डॉ. राऊत यांनी सांगितले.
वनविभागाने स्थानिक ग्रामस्थ, सामाजिक संस्था आणि पर्यावरणप्रेमींच्या सहकार्याने विशेष कृती आराखडा राबवावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी विनोबा भावे ग्रामविकास प्रतिष्ठान, मलठणचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव खोसे आणि युवक क्रांती दलाचे संघटक आप्पा अनारसे उपस्थित होते.

