दिव्यांग बांधवांचे मासिक आर्थिक सहाय्य ६००० रुपये करा

कर्जत : प्रा. किरण जगताप

महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधवांना मिळणारे मासिक आर्थिक सहाय्य वाढवून सध्याचे अडीच हजार रुपये असलेले पेन्शन ६ हजार रुपये करण्यात यावे अशी महत्त्वपूर्ण मागणी बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग मनोहर सोनवणे, धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर, धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार शोभा दिनेश बच्छाव, माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, नांदेड मतदारसंघाचे खासदार रवींद्र चव्हाण, दिंडोरी मतदारसंघाचे खासदार भास्कर मुरलीधर भगरे, धाराशिव मतदार संघाचे आमदार कैलास आबासाहेब घाडगे पाटील, बार्शी मतदार संघाचे आमदार दिलीप सोपल यांनी केली आहे.

यासंदर्भात सर्वांनी महाराष्ट्र राज्याचे दिव्यांग सक्षमीकरण मंत्री अतुल सावे यांना अधिकृत पत्र पाठवून दिव्यांग बांधवांच्या मागणीसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली आहे.

पत्रामध्ये त्यांनी नमूद केले आहे की वाढत्या महागाईच्या तुलनेत दिव्यांग बांधवांना मिळणारे मासिक आर्थिक सहाय्य अपुरे आहे. दैनंदिन गरजा भागवताना त्यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांना सन्मानाने जीवन जगता यावे आणि आर्थिक आधार मिळावा यासाठी मासिक पेन्शनमध्ये वाढ करून ६ हजार रुपये करण्यात यावे. तसेच दिव्यांगांसाठी राखीव निधीचा प्रभावी वापर करून त्यांना शिक्षण, आरोग्य आणि स्वयंरोजगाराच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनीही दिव्यांग बांधवांच्या मानधनवाढीचा प्रश्न शासनदरबारी मांडावा अशी मागणी कर्जत तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी केली आहे. या दोन्ही लोकप्रतिनिधींनी मंत्री अतुल सावे यांच्याकडे दिव्यांगांचे मासिक मानधन वाढवून ६ हजार रुपये करण्याबाबत पत्र द्यावे आणि या मागणीसाठी शासनाकडे पाठपुरावा करावा अशी विनंती दिव्यांग बांधवांनी केली आहे.