
कर्जत तालुक्यातील जळकेवाडी येथे गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या व घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून अवघ्या दोन दिवसांत चोरी व घरफोडीच्या तब्बल पाच घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनांमध्ये एका एकल महिलेवरही हल्ला करण्यात आल्याचा उल्लेख ग्रामस्थांनी निवेदनात केला आहे. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

या पार्श्वभूमीवर जळकेवाडी येथील ग्रामस्थांनी सोमवार दि.१६ नोव्हेंबर २०२६ रोजी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की गावामध्ये सातत्याने चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी चोरट्यांकडून होणाऱ्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे.

त्यामुळे जळकेवाडी गावामध्ये पोलिसांची नियमित गस्त सुरू करावी. तसेच यापूर्वी घडलेल्या चोरीच्या घटनांचा सखोल तपास करून चोरट्यांचा शोध घ्यावा व त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलिसांनी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. ग्रामस्थांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित योग्य ती कार्यवाही करावी अशी विनंती करण्यात आली आहे.
राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी

