
विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्याबद्दल आमदार रोहित पवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी बोलताना भाषेचे भान ठेवावे. राजकीय विरोधाच्या नावाखाली वैयक्तिक पातळीवर उतरून अपमानास्पद वक्तव्ये करण्याची प्रवृत्ती यापुढे खपवून घेतली जाणार नाही. राम शिंदे यांच्याबद्दल अवमानकारक भाषा वापरणाऱ्यांना किसान मोर्चा जशास तसे उत्तर देईल, असा आक्रमक इशारा किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय नलवडे यांनी दिला.
लोकशाहीत राजकीय विरोध करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे; मात्र विरोधाच्या नावाखाली सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणे आणि ज्येष्ठ नेत्यांचा अवमान करणे हा प्रकार निषेधार्ह आहे. राजकीय मतभेद असतील तर ते धोरणांवर, विकासकामांवर आणि विचारांवर व्यक्त करावेत. व्यक्तीचा मान-सन्मान पायदळी तुडवून राजकीय वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असे नलवडे यांनी ठणकावून सांगितले.
प्रा. राम शिंदे हे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनुभवी नेतृत्व असून सध्या विधान परिषदेच्या सभापतीपदासारख्या घटनात्मक महत्त्वाच्या पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. अशा पदावरील व्यक्तीबद्दल बोलताना किमान सभ्यता आणि पदाचा सन्मान राखणे अपेक्षित आहे. मात्र, राजकीय टीकेच्या नावाखाली मर्यादा ओलांडली जात असेल, तर त्याचा जाहीर निषेध केला जाईल, अशी भूमिका नलवडे यांनी मांडली.
राम शिंदेंबद्दल यापुढे अपशब्द काढण्याची हिंमत करू नका. राजकीय विरोध करायचा असेल तर तो राजकीय पातळीवर करा; वैयक्तिक अपमान करण्याचा प्रयत्न केल्यास किसान मोर्चा गप्प बसणार नाही. राम शिंदे यांच्या सन्मानाला धक्का पोहोचवणारे वक्तव्य यापुढे सहन केले जाणार नाही, असा थेट आणि कठोर इशारा दत्तात्रय नलवडे यांनी दिला.
राजकारणात विरोधकांवर टीका करण्याची परंपरा असली, तरी ती टीका विवेक, संयम आणि सभ्यतेच्या चौकटीत असावी. सार्वजनिक जीवनात जबाबदारीने बोलणे अपेक्षित असताना, वारंवार वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करणे राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही. राम शिंदेंचा सन्मान राखणे हीच भूमिका असून, त्यांच्या अवमानाविरोधात किसान मोर्चा आक्रमक भूमिका घेणार असल्याचे नलवडे यांनी स्पष्ट केले.



