तुकाई उपसा जलसिंचन योजनेचा २३ नोव्हेंबरला उद्घाटन सोहळा ; २१ वंचित गावांचे पाण्याचे स्वप्न साकारणार

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील चिंचोलीसह जवळपास २१ वंचित गावांसाठी २३ नोव्हेंबर २०२६ हा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाण्याच्या प्रश्नाला दिलासा देणाऱ्या तुकाई उपसा जलसिंचन योजनेचा उद्घाटन सोहळा विधान परिषद सभापती तथा योजनेचे प्रणेते प्रा. राम शिंदे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून अनेक पिढ्यांनी पाहिलेले पाण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडणार असल्याची भावना चिंचोली काळदातचे माजी उपसरपंच गणेश परशुराम काळदाते यांनी व्यक्त केली.
तुकाई उपसा जलसिंचन योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रा. राम शिंदे यांनी सातत्याने भगीरथ प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे अखेर ही महत्त्वाकांक्षी योजना कार्यान्वित होण्याच्या टप्प्यावर पोहोचली आहे. आजही पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून असलेल्या गावांना या योजनेमुळे कुकडी प्रकल्पांतर्गत मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. योजना मंजूर करताना कुकडी प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा आणि आवश्यक तांत्रिक बाबींचा विचार करून नियोजन करण्यात आले आहे.
या योजनेमुळे पाण्यापासून वंचित राहिलेल्या गावांच्या पाणीप्रश्नावर तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली आहे. योजनेच्या उभारणीसाठी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी प्रा. राम शिंदे यांनी केलेले प्रयत्न महत्त्वपूर्ण असल्याचे काळदाते यांनी नमूद केले.
या महत्त्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून २१ वंचित गावांच्या पाणीप्रश्नाला दिलासा देण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. तसेच लाभार्थी गावांच्या पाण्याच्या प्रश्नाला प्राधान्य देऊन योजनेसाठी बहुमोल सहकार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही समस्त ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या वतीने विशेष आभार व्यक्त केले, असे चिंचोली काळदातचे माजी उपसरपंच गणेश परशुराम काळदाते यांनी सांगितले.