
दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या कर्जत तालुक्यातील कुळधरण आणि राक्षसवाडी परिसरातील शेतकऱ्यांना आता महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागातील गलथान कारभाराचा मोठा फटका बसणार आहे. या भागातील कुकडी कालव्याच्या चाऱ्या मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त झाल्या असून अनेक ठिकाणचे गेट तुटलेल्या अवस्थेत आहेत. येत्या चार- पाच दिवसात डीवाय १५ नंबरच्या चारीला पाणी सुटणार आहे. मात्र, संबंधित कालवा निरीक्षकाच्या पूर्ण दुर्लक्षामुळे पाण्याची मोठी नासाडी होण्याची आणि शेवटच्या टोकापर्यंत पाणी न पोहोचण्याची परिस्थिती आहे.

सध्या परिसरात तीव्र दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतीच्या पाण्याची प्रचंड मागणी आहे. टेल टू हेड पद्धतीने आवर्तन देण्याचे प्रशासनाचे नियोजन असते. हे नियोजन यशस्वी होण्यासाठी चाऱ्या आणि गेट सुस्थितीत असणे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्यक्षात डीवाय १५ नंबरच्या चारीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. आवर्तनाच्या महत्त्वाच्या काळात संबंधित कालवा निरीक्षक जागेवर फिरकत नसल्याने आणि देखभालीकडे पूर्णपणे पाठ फिरवल्याने गेटची तोडफोड झाल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.
पाणी सुटण्यास अवघे काही दिवस शिल्लक असतानाही दुरुस्तीचे कोणतेही काम हाती घेतलेले नाही. या नियोजनशून्य कारभारामुळे हक्काचे पाणी असूनही कुळधरण व राक्षसवाडी भागातील शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. पाटबंधारे विभागाने या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घ्यावी, आवर्तन सुरू होण्यापूर्वी चारी आणि तुटलेल्या गेटची दुरुस्ती करावी, तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित कालवा निरीक्षकाची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

तुटलेल्या गेटची दुरुस्ती करण्यासाठीचे टेंडर झालेले आहे. काही दिवसातच गेटच्या दुरुस्तीची कामे होतील. मोडतोड करता येणार नाही अशा पद्धतीचे गेट आता चारीवर बसवली जाणार आहेत.
– श्रीरंग मेहेर
उपविभागीय अभियंता, कुकडी पाटबंधारे उपविभाग, राशीन

