
कर्जतच्या दुष्काळी भूमीला पाण्याचा आधार मिळावा, शेतकऱ्यांच्या कष्टांना समृद्धीची जोड मिळावी, असे स्वप्न अनेक वर्षांपासून पाहिले जात होते. या स्वप्नाला वास्तवात आणण्यासाठी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा, जिद्द आणि लोकहिताची तळमळ यांतून तुकाई उपसा सिंचन योजनेचा संघर्षमय परंतु यशस्वी प्रवास सफल केला. आज या योजनेचा शुभारंभ म्हणजे त्यांच्या भगीरथ प्रयत्नांची फलश्रुती आहे.
कुकडी डावा कालवा पाण्याचा उपयोग करून कर्जतच्या अवर्षणग्रस्त भागातील १९ गावांमधील २७ जलसाठ्यांचे पुनर्भरण करण्याची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. ६६ कोटी ८३ लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून ५९९ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार असून, शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी देण्याची क्षमता या प्रकल्पात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या विकासस्वप्नाला प्रत्यक्ष कृतीची दिशा मिळाली.
महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यासाठी विकास म्हणजे सामान्य माणसाच्या जीवनात घडणारा परिवर्तनकारी दृश्य बदल. पाण्यासाठीचा संघर्ष, प्रशासकीय पाठपुरावा आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षांशी जोडलेली संवेदनशीलता, ही त्यांच्या कार्याची ओळख राहिली आहे. तुकाई योजना ही त्याच जनसेवेच्या दृष्टिकोनाची साक्ष आहे.
कर्जतच्या शिवारात पावसाच्या अनिश्चिततेने अनेकदा शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले. पेरणीपासून काढणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर पाण्याची चिंता, उत्पादनाची अनिश्चितता आणि आर्थिक संकटाची भीती शेतकरी अनुभवत होता. या वास्तवाची जाणीव ठेवून शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नाला विकासाच्या केंद्रस्थानी आणणे, ही प्रा. राम शिंदे यांच्या राजकीय वाटचालीतील महत्त्वाची भूमिका राहिली. शेतकऱ्यांच्या प्रश्नाला त्यांनी केवळ निवेदन किंवा मागणीपुरते मर्यादित न ठेवता, त्याच्या कायमस्वरूपी समाधानासाठी प्रयत्नांची दिशा दिली.
मोठे प्रकल्प केवळ मंजुरीने पूर्ण होत नाहीत; त्यासाठी सातत्य, संयम, प्रशासनाशी समन्वय,पाठपुरावा आणि प्रत्यक्ष कामाला गती देण्याची इच्छाशक्ती आवश्यक असते. तुकाई उपसा सिंचन योजनेच्या प्रवासात अनेक अडथळे आले, मात्र शेतकऱ्यांच्या हिताचा ध्यास कायम राहिला. वेळोवेळी शासन स्तरावर पाठपुरावा करून, अडचणींवर मार्ग शोधत आणि उपलब्ध संधींचा उपयोग करून ही योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. विकासकामामागे असलेली ही चिकाटीच त्यांच्या नेतृत्वाचे वेगळेपण अधोरेखित करते.
पाणी उपलब्ध झाल्यास शेतीच्या उत्पादनक्षमतेत वाढ, पीक पद्धतीत बदल, पशुधनाला आधार आणि गावांमध्ये आर्थिक चक्राला गती मिळण्याची शक्यता निर्माण होते. तलाव आणि जलसाठ्यांचे पुनर्भरण हे भूजल पातळी सुधारण्यासाठीही पूरक ठरू शकते. तुकाई योजनेच्या माध्यमातून केवळ शेताला पाणी मिळणार नाही, तर गावांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनातही सकारात्मक परिवर्तनाची नांदी होईल. शेती समृद्ध झाली तर गाव समृद्ध होते, ही विकासाची मूलभूत संकल्पना या योजनेतून साकारण्याची आशा आहे.
पाण्याचा प्रश्न हा पक्ष, विचारधारा किंवा राजकीय सीमांच्या पलीकडे जाणारा प्रश्न आहे. शेतकरी सुखी झाला पाहिजे, ग्रामीण भागाला विकासाच्या संधी मिळाल्या पाहिजेत आणि सामान्य कुटुंबांच्या जीवनात स्थैर्य आले पाहिजे, हा विचार तुकाई योजनेच्या केंद्रस्थानी आहे. विविध स्तरांवरील सहकार्य, शासनाची सकारात्मक भूमिका आणि जनतेच्या एकजुटीमुळे हा प्रकल्प पुढे आला. लोकांच्या प्रश्नांसाठी राजकीय इच्छाशक्ती कामी आली, तर परिवर्तन शक्य होते, याचे हे जिवंत उदाहरण आहे.
तुकाईचे पाणी तलावांत पोहोचेल, शिवार हिरवेगार होईल आणि शेतकरी कुटुंबांच्या जीवनात स्थैर्य येईल, तेव्हा या संघर्षाचे खरे सार्थक होईल. कर्जतच्या जलसमृद्धीचे स्वप्न साकारण्याचा ध्यास घेतलेल्या प्रा. राम शिंदे यांचे योगदान निश्चितच जलक्रांतीचे अग्रदूत आणि अवर्षणग्रस्त भागाचे भगीरथ म्हणून अधोरेखित होईल. कारण, तुकाई उपसा सिंचन योजना म्हणजे आशा, विश्वास, कष्ट आणि विकास यांच्या संगमातून उभे राहिलेले समृद्ध भविष्य आहे.



