दिव्यांग व्यक्तीच्या जागी बनावट व्यक्ती उभा करून जमिनीची खरेदी-विक्री केली, म्हणून न्यायालयाच्या आदेशानंतर कर्जत पोलिसात गुन्हा दाखल असलेल्या भांबोरा व राक्षसवाडी बुद्रुक येथील सर्व आरोपींचे जामीन अर्ज श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी (दि. ४ ) फेटाळले. बनावट दस्तऐवज करून फसवणूक केल्याचा गुन्हा त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, पांडुरंग केरु गजरमल (रा. पुणे) हे दिव्यांग असून त्यांना इतरांच्या मदतीशिवाय हालचाल करता येत नाही. त्यांची जमीन कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी येथील गट क्रमांक २४० मध्ये आहे. याची पूर्ण माहिती असलेले भैय्या दिलीप कांबळे, योगेश लोणकर, उत्तम विठ्ठल रंधवे ( तिघेही रा. भांबोरा), बाळू भानुदास काळे व अल्लाउद्दिन कमाल शेख ( दोघे रा. राक्षसवाडी बुद्रुक) यांनी संगणमत करून कर्जत येथील दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट व्यक्ती उभा करून गजरमल यांच्या नावावर सिद्धटेक येथील सेंट्रल बँकेमध्ये बनावट खाते उघडले. तसेच बनावट आधार कार्ड व इतर कागदपत्र तयार करून २. ०२ हेक्टर जमीन कुशल ओंकार शितोळे यांच्यासाठी ओंकार रामराव शितोळे ( रा. मोशी, जि. पुणे) यांना विकण्यात आली. यासाठी बिनताबा साठेखत व कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र असे दोन खोटे बनावट दस्त दुय्यम निबंधक कार्यालयात ८ डिसेंबर २०२३ रोजी तयार केले. नंतर ओंकार शितोळे यांचा मुलगा कुशल शितोळे यास विक्री केल्याचे दस्त बनविले. यात गजरमल यांच्या जमिनीची किंमत १३ लाख ९० हजार रुपये दाखवून खरेदी करून सर्व रक्कम घेऊन फसवणूक केली. या खरेदी-विक्री प्रकरणांमध्ये उत्तम विठ्ठल रंधवे हाच पांडुरंग गजरमल असल्याचे भासवून त्याच्या नावे दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी केल्याचे व बँकेत खाते उघडून फसवणूक केली आहे.
ही घटना पांडुरंग गजरमल यांना लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन याबाबतच्या दस्ताच्या साक्षांकित प्रती मिळवल्या. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. यानंतर पांडुरंग गजरमल यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. न्यायालयाने याचिकेची दखल घेऊन गजरमल यांच्या बाजूने निकाल देत भैय्या कांबळे, योगेश लोणकर, बाळू काळे, अल्लाउद्दीन शेख, उत्तम रंधवे यांच्याविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता.
सर्व आरोपींनी श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. शिंगाडे यांच्या कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केलेले होते. या जामीन अर्जावर आरोपीचे वकील व सरकारी वकील केदार केसकर तसेच मूळ फिर्यादीच्या वतीने ॲड. सुमित के. पाटील यांनी बाजू मांडली. गुन्ह्याचे गांभीर्य, तीव्रता, आरोपींचा सहभाग, बनावट दस्तऐवज, बनावट आधार कार्ड आणि सिद्धटेक येथील बँकेत बनावट खाते उघडून केलेली फसवणूक आदी मुद्दे मूळ फिर्यादीच्या वतीने कोर्टात सादर करण्यात आले. तसेच फिर्यादी हा वयोवृद्ध वय ८१ वर्षांचा असून ६३ टक्के अपंग आहे. फिर्यादीची वर्ग दोनची जमीन बळकवण्यात या सर्वांनी संगणमताने कट रचून केलेली कृती कोर्टाच्या समोर फिर्यादीच्या वतीने अधोरेखित केली. या सर्व घटनांचा, कायदेशीर तरतुदींचा विचार करून शुक्रवारी कोर्टाने सर्व आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले.
वैभव पवार, कर्जत तालुका प्रतिनिधी