कर्जतमध्ये ५३ हजारांची रक्कम व दुचाकीसह एकाला पकडला

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत पोलीस स्टेशन हद्दीतील राशीन पोलीस दुरक्षेत्रातील परि. पोलीस उपनिरीक्षक प्रियंका बावणे या स्टाफसह राशीन दुरक्षेत्र हद्दीतील वायसेवाडी फाट्याजवळ पेट्रोलिंग करत होत्या. दरम्यान एका इसमाने त्यांना माहिती दिली की, एक इसम दुचाकीवरून मतदारांना पैसे वाटण्यासाठी फिरत आहे. माहिती मिळताच प्रियंका बावणे यांनी कर्जतचे पोलीस निरीक्षक मारुती मुळुक यांना याबाबत माहिती दिली.

पोलीस निरीक्षक मुळूक यांनी त्यांना त्या ठिकाणी जाऊन खात्री करण्याचे कळविले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक बावणे यांनी त्या दुचाकीवरील इसमास थांबवून त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे ५३८६० रुपयांची रोख रक्कम मिळून आली. त्याचे नाव अमोल दत्तु जमदाडे, रा. जळोची, ता. बारामती जि. पुणे असे आहे. त्या व्यक्तीला दुचाकीसह ( एमएच १२, एबी ९३५९) राशीन पोलीस दुरक्षेत्र येथे आणण्यात आले. पुढील कारवाई करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.