कर्जत येथील स्ट्रॉंग रूमच्या बाहेर सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी नेमण्यात आलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी कर्जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, कर्जत येथील शारदाबाई पवार सभागृह स्ट्रॉंग रूममध्ये सील केलेले ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेले आहेत. त्यासाठी मोठी सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे. उमेदवार रोहित राजेंद्र पवार यांचे प्रतिनिधी म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांनी राहुल ज्ञानदेव नाळे व भगवान लक्ष्मण हौसारे यांची नेमणूक केलेली आहे. सुरक्षा कर्मचारी यांच्यासोबत स्ट्रॉंग रूम बाहेरच्या सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांची नेमणूक केलेली आहे. गुरुवारी रात्री आठ वाजेपासून ते शारदाबाई पवार सभागृह, स्ट्रॉंग रूम बाहेरच्या रस्त्यावर ते कार्यरत होते. त्यांच्या समवेत अभिजीत अरुण भोसले व दिगंबर आबा जाधव हेही हजर होते.
त्यानंतर रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास तेथे इंडीव्हर गाडीमध्ये ( एमएच १२, आरएन ७७७७ ) तसेच मोटारसायकलवर १० ते १५ लोक आले. त्यानंतर सर्वांनी रस्त्यावर लावलेल्या बॅरिकेटमधून स्ट्रॉंग रूममध्ये येण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बंदोबस्तास असलेल्या पोलिसांनी त्यांना पासची मागणी केली. मात्र त्यांच्याकडे पास नव्हते. त्यातील गणेश क्षीरसागर व पिसाळ नावाच्या व्यक्तीने (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही ) फिर्यादी नाळे यांना विचारले, तुम्ही येथे काय करता ? तुम्ही येथे कसे काय थांबले ?
त्यावेळी नाळे यांनी त्यांना सांगितले की, मी रोहित पवार यांचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत असून माझ्याकडे निवडणूक अधिकाऱ्यांची परवानगी आहे. त्यांना परवानगी दाखवत असतानाच गणेश क्षीरसागर, पिसाळ व सोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी गळा दाबून व हात धरून मला हाताने मारहाण केली. तसेच सोबत असलेल्या अभिजीत भोसले यांनाही सर्व लोकांनी हाताने मारहाण करून नाळे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तू येथे थांबला तर तुला जीवच मारून टाकीन असा दम दिला, असे नाळे यांनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी गणेश क्षीरसागर, पिसाळ व इतर दहा ते तेरा जणांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १८९ (२), १९१(१), १९१ (२), ११५ ( २), ३५१ (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्जत पोलीस अधिक तपास करीत आहे.
भाजपच्या सुमारे २५- ३० कार्यकर्त्यांनी मध्यरात्री ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, परंतु माझे कार्यकर्ते आणि CRPF च्या जवानांनी संयमाने परिस्थिती हाताळत हा प्रयत्न हाणून पाडल्याबाबत त्यांचे आभार ! याबाबत गुन्हा दाखल करताना भाजपच्या दबावाखाली असलेल्या स्थानिक पोलिस प्रशासनाने मात्र सहकार्य करण्याऐवजी त्रास देण्याचीच भूमिका घेतली, याची निवडणूक आयोगाने योग्य ती दखल घ्यावी. भाजप कार्यकर्त्यांचा हा प्रयत्न म्हणजे पराभवाच्या भितीने सुरु असलेली गुंडागर्दी आहे… पण पुढील चोवीस तासातच कर्जत- जामखेडच्या जनतेकडून लोकशाही मार्गाने या गुंडगिरीला चाप बसल्याशिवाय राहणार नाही.
– रोहित पवार, आमदार
सर्व सत्य परिस्थिती असताना, सीसीटीव्ही फुटेज असतानाही पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब केला. प्रशासन जाणूनबुजून त्रास देत असून गुन्हा दाखल करण्यासाठी पहाटेचे अडीच- तीन वाजवले. गुन्हेगारांसाठी योग्य कलमांचा वापरही केला नाही.
– दिपक शिंदे, रोहित पवार समर्थक, बहिरोबावाडी