
कर्जत तालुक्यातील राशीन येथील वृत्तपत्र विक्रेते किशोर दिगंबर कांबळे यांच्या विक्रीसाठी आलेल्या वृत्तपत्रांच्या गठ्ठ्यांची चोरी सोमवारी सकाळी झाली होती. नेहमीप्रमाणे अहिल्यानगर येथून पेपर गाडीने वाहतूक करून वितरकांनी वृत्तपत्रांचे गठ्ठे कांबळे यांच्या दुकानासमोर ठेवले. मात्र काही वेळातच हे गठ्ठे गायब झाले. वृत्तपत्रांचे वितरण करण्यासाठी किशोर कांबळे आले असता त्यांच्या हा प्रकार निदर्शनास आला.

किशोर कांबळे यांना सर्वत्र चौकशी करूनही तपास न लागल्याने त्यांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. यामध्ये त्यांना राशीन येथील विष्णू इंगळ्या भोसले याने पेपरचे गठ्ठे लंपास केल्याचे निदर्शनास आले. याबाबतची माहिती राशीन पोलीस दुरक्षेत्रात दिली. त्याची माहिती घेतली असता तो गावातच फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने पेपरची चोरी केल्याची कबुली दिली. पेपरचे सर्व गठ्ठे हे कांबळे यांच्या दुकानासमोरील लिंगायत स्मशानभूमी जवळील महादेव मंदिराच्या पाठीमागील खड्ड्यात पुरून ठेवल्याची माहिती दिली. कांबळे यांनी वृत्तपत्र संघटनेचे कर्जत तालुकाध्यक्ष विशाल रेणुकर व वृत्तपत्र विक्रेते बाळासाहेब ढाणके यांना दिली.

भोसले याला घेऊन ते वृत्तपत्राचे गठ्ठे लपवलेल्या ठिकाणी गेले असता त्यांना पेपरचे सर्व गठ्ठे खड्ड्यात टाकून त्यावर माती ढकललेल्या अवस्थेत आढळून आले. त्यानंतर विष्णू इंगळे याला दुकानाकडे नेण्यात आले. हा सराईत गुन्हेगार असल्याने आणि तो अनेकांच्या चोऱ्या करत असल्याने स्थानिक नागरिकांनी त्याची चांगलीच धुलाई केली. त्यानंतर त्याला रिक्षामध्ये टाकून पोलीस राशीन दूरक्षेत्रात नेण्यात आले. तेथेही त्याने पेपरची चोरी केल्याचे कबूल केले. पोलिसांनीही त्याला खाकीचा हिसका दाखवला. त्यानंतर त्याला सोडून देण्यात आले असल्याची माहिती किशोर कांबळे यांनी दिली.
